यवतमाळ : शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी १४ जुलैला अंभोरा येथे होणाऱ्या सभेत रुमणे आणि लाठ्या-काठ्या घेऊनच या, असा थेट इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी दिला आहे. सातबारा कोरा करा या पदयात्रेत दारव्हा तालुक्यातील तळेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. आता घोषणा पुरेशा नाहीत, तर कृती हवी. सरकारला वठणीवर आणायचं असेल, तर निर्धाराने रस्त्यावर उतरावे लागेल, असे ते म्हणाले.
कडू यांच्या आवाहनानंतर ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तळेगाव येथील सभेत त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व बंजारा समाजाचे नेते वसंतराव नाईक यांचं स्मरण करत त्यांचा आदर्श पुन्हा जिवंत केला. वसंतराव नाईक हे केवळ मुख्यमंत्री नव्हते, तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे साथीदार होते. त्यांनी जेव्हा रोजगार हमी योजनेची कल्पना दिली, तेव्हा लाखो गरिबांना पोटभर अन्न मिळालं. आज तेच सरकार त्यांच्या वारशाचा अपमान करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
शेतकऱ्यांचे पाणी बंद, वीज बंद, अनुदान थांबले, विमा कंपन्यांच्या लुटीला संरक्षण, हे सहन करायचं असेल तर आपण मृत समजून घ्यावं. पण आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं ठरवलं आहे. झुंजून, लढून आणि सरकारला गुडघ्यावर आणूनच ही पदयात्रा थांबेल, असे ते म्हणाले.ही फक्त पदयात्रा नाही, तर बापाला जिवंत ठेवण्यासाठीची लढाई आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आज सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यावर कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ आलीय.मागील तीन महिन्यात महाराष्ट्रात तब्बल ६६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.आता बापाला वाचवायचं असेल तर जात पात धर्म राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेऊन सातबारा कोरा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संततधार पाऊस तरीही शेतकरी सोबत
बच्चू कडू यांनी पुकारलेली सातबारा कोरा कोरा पदयात्रा ७ जुलैपासून सुरू आहे. तीन दिवसांत पावसाने एक क्षणही उसंत दिली नाही. संततधार पावसामुळे मार्ग चिखलमय झाला असतानाही हजारो शेतकऱ्यांची पावले या पदयात्रेत बच्चू कडू यांच्यासोबत चालत आहेत. अनेक शेतकरी त्यांच्या लहान मुलांना सोबत घेऊन हा प्रवास करत आहेत. आंदोलनात सहभागी असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा आहे, पण डोळ्यांत लढण्याची जिद्द आहे. शेतकरी धोरणांविरोधात ही पदयात्रा केवळ प्रतिकार नव्हे, तर क्रांतीचा उद्घोष ठरत असल्याचा अनुभव या पदयात्रेत सहभागी शेतकरी घेत आहेत.