यवतमाळ : ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’, या म्हणीचे प्रत्यंतर सध्या यवतमाळचे नागरिक घेत आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण केव्हाच ‘ओव्हरफ्लो’ झाले. मात्र मजिप्राच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शहरातील अर्ध्याअधिक भागात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. धो-धो पाऊस बरसत असताना, अनेक घरी टँकरने पाणी आणण्याची वेळ आली आहे.
अमृत योजनेच्या निर्मितीनंतर यवतमाळकरांना २४ तास पाणी मिळेल, असा विश्वास दिला गेला. अमृतसाठी शहराच्या विविध भागात जवळपासू नऊ मोठ्या पाणी साठवण टाक्या उभारण्यात आल्या. मात्र अमृत योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने दिलेल्या अवधीत यवतमाळकरांना पाणीच मिळाले नाही. ही योजना रखडत, रखडत पूर्ण झाली तरी, अद्यापही यवतमाळकरांचे पाण्यासाठी हालच सुरू आहेत. काही भागात मजिप्राने २४ तास तर काही भागांत एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन वर्षभरापूर्वी केले. मात्र हे नियोजन आठवडाभरही टिकले नाही. उन्हाळ्यात अनेक भागात टँकरशिवाय पर्याय नसतो. मात्र आता शहराला पाणी पुरवठा करणारे धरण ओसंडून वाहत असतानाही नागरिकांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. शहरातील वडगाव रोड भागात पृथ्वीराज नगर, तुळजा नगरी, आशीर्वाद नगर, शारदा नगर, मुंगसाजी नगरसह संपूर्ण वडगाव भागात गेल्या महिनाभरात नळ नियमित सोडण्यात आले नाही. गेल्या १० दिवसांपासून या भागात नळच येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शहरातील लोकप्रतिनिधींना या बाबीची कल्पना देवूनही अद्याप तोडगा न निघाल्याने संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत नसल्याची ओरड आहे. अनेक जबाबदार अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद असतात किंवा हे अधिकारी फोनच घेत नसल्याची तक्रार आहे. या संदर्भात मजिप्राचे उपअभियंता प्रफुल्ल कांबळे यांना विचारणा केली असता, गेल्या आठ, दहा दिवसांपासून पाणी वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्याचे त्यांनी सांगितले. शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी सात पंपिंग स्टेशन आहेत. या भागात वीज अनियमित असल्याने पाणी ओढण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले. यवतमाळचा सर्व पाणी पुरवठा ‘ग्रॅव्हिटी’शिवाय विजेच्या भरवशावर असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी पुरवठा ही अत्यावश्यक सेवा असतानाही मजिप्रा नळ बंद ठेवण्याची कोणतीच सूचना न देता पाणी पुरवठा सलग आठ, दहा दिवस बंद ठेवत असल्याने नागरिकांच्या जीवन, मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्याशी संपर्क साधला असता लक्ष घालतो, असे सांगितले. जनतेच्या प्रश्नांवर अधिकारी, लोकप्रतिनिधी कोणीच प्रतिसाद देत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.