यवतमाळ : नागरिकांच्या जीवन मरणाशी थेट संबंध असलेल्या आरोग्य क्षेत्रात व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून अनधिकृतपणे चालणाऱ्या नर्सिंग होमचा भांडाफोड करण्यात आला. जनतेच्या जीवाशी खेळ करणारा हा प्रकार नेर येथे उघडकीस आला. नेरमध्ये दुसऱ्यांदा अवैध नर्सिंग होमचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.नेर येथील शिवाजीनगरात अवैधरित्या सुरु असलेल्या डॉ. सुनंदा जैन यांच्या जैन नर्सिंग होम सेंटरवर वैद्यकीय पथकाने कारवाई केली. नेर शहरातील ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी येथील ताज नर्सिंग होमवर कारवाई झाली होती.
वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी बॉम्बे होम नर्सिंग अंतर्गत रुग्णालयाची नोंदणी आवश्यक आहे. परंतु डॉ.जैन ह्या अवैध प्रसूतीगृह व गर्भपात केंद्र चालवीत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वैद्यकीय पथकाला मिळाली. त्यावरून गुरुवारी सेंटरवर धाड टाकण्यात आली. दरम्यान, महिलांच्या प्रसुतीसाठी लागणारे साहित्य व औषधी पथकाने जप्त केली आहे. या सेंटरवर अवैधरित्या गर्भपात केले जात असल्याचेही मिळालेल्या औषधीसाठ्यावरून पुढे आले. डॉ. जैन यांच्याकडे नर्सिंग होम चालवण्याकरिता लागणारे बॉम्बे नर्सिंग होमचे नोंदणी तसेच बायोमेडिकल वेस्ट प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन झाले. यावरून ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. खान वसीम अयुब खान यांच्या तक्रारीवरून डॉ. जैन यांच्या विरोधात नेर ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. नेर शहरात अवैध नर्सिंग होम थाटले जात असल्याचे दुसऱ्यांदा उघडकीस आले आहे. काही महिन्यांपूर्वी येथील ताज नर्सिंग होमवरसुद्धा कारवाई करण्यात आली. ही कारवाई वैद्यकीय निवासी अधिकारी डॉ. रमेश मांडण, डॉ. प्रीती लांमकासे, विधीतज्ज्ञ पूनम महात्मे, शीतल वैद्य, अनिकेत इंगोले, यशवंत मेश्राम तसेच वाहनचालक शंकर भागडकर यांनी केली. या प्रकरणाचा अधिक तपास नेर ठाणेदार अनिल बेहेराणी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
नेर शहरात दोन महिन्यात ताज तसेच जैन नर्सिंग होम हे दोन सेंटर कारवाईच्या कक्षेत आले आहे. परंतु, यासोबतच अन्य सेंटरची पडताळणी करणे गरजेचे आहे. नेर तालुक्यासह जिल्हाभरात बोगस डॉक्टरांचा संचार आहे. कुठलेही वैद्यकीय शिक्षण वा अनुभव नसताना त्यांच्या हातात ग्रामीण नागरिकांची नाडी आहे. या बोगस डॉक्टरांना ग्रामीण भागातून हद्दपार करण्याचे मोठे आव्हान जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयावर आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांची पूर्तता करण्यासाठी बरीच कसरत करावी लागते परंतु अवैध रुग्णालय थाटणाऱ्यांसाठी कोणतीच अडचण येत नाही. हाच धागा पकडून डॉक्टरांनी नेर शहरात अवैध नर्सिंग होम सेंटर थाटले आहे.अवैध गर्भपात करण्यासाठी ज्यादा पैसे मिळत असल्याने डॉक्टरांनी ही शक्कल लढविली आहे. अवैध म्हणून कारवाई झालेल्या नर्सिंग होम सेंटरवर केवळ गुन्हे दाखल होतात. कारवाई होत नाही, त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी नाव बदलून अवैध नर्सिंग होम उभारले जात आहे. गुन्हे दाखल होतात मात्र पुढे कुठलीच कारवाई होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
बॉम्बे होम नर्सिंग कायद्याची भीती संपली
डॉ.सुनंदा जैन यांनी जैन नर्सिंग होम सुरु करण्यासंदर्भात कुठल्याही शासकीय बाबींची पूर्तता केली नसल्याचे कारवाईतून उघड झाले आहे. रुग्ण सेवा पुरविण्यासाठी शासनाने बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट, पीसीपीएनडीटी सारख्या कायद्यानुसार कागदपत्रांची व आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहे. परंतु, डॉ. जैन यांनी बॉम्बे होम नर्सिंग कायद्यानुसार नोंदणी केली नाही. त्यांच्याकडे अग्निशमन विभागाचे नाहारकत प्रमाणपत्र नव्हते. याशिवाय या नर्सिंग होममधून होणाऱ्या प्रसुतींची नोंद ठेवणारे रजिस्टर आढळून आले नाही. त्यामुळे वैद्यकीय पथकाने या नर्सिंग होमला सील ठोकले आहे. डॉ. जैन यांच्यावर बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या कायद्यानुसार जिल्हाभरातील बोगस रुग्णालयांचा शोध घेतला जात नाही. चिरीमिरी घेऊन संबंधितांना पाठीशी घातले जाते त्यामुळे या कायद्याची भीती संपल्याची वास्तविकता आहे.