यवतमाळ : खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असतानाही जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाची टक्केवारी अत्यंत अल्प आहे. त्यामुळे हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज वाटप न केल्यास बँकेत ‘ मुक्काम पोस्ट ‘ आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने येथील अग्रणी बँकेस दिला.
बँकांच्या कर्जवाटपातील उदासीनतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून येत्या आठ दिवसांमध्ये अपेक्षित कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी बँकेला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील १९ बँकांच्या २७७ शाखांना एकूण दोन हजार २०० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र १३ मेपर्यंत केवळ ३९६.७८ कोटी इतकेच कर्जवाटप झाले आहे. ही टक्केवारी केवळ १८.४ इतकी आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून कर्ज वाटपाच्या धिम्या गतीमुळे खरीप हंगामाच्या तयारीसाठी गरजेचे असलेले बी-बियाणे, खते, औषधे, मशागत यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक भांडवल उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना टाळाटाळ करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी केला आहे.
त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने बँकर्स कमिटीची तात्काळ बैठक बोलवावी. अपयशी ठरलेल्या बँक शाखांवर कारवाई करावी. पात्र शेतकऱ्यांना नवीन कर्ज मंजुरीसाठी प्रक्रिया सुलभ करावी. थकीत कर्जदारांसाठी सवलतीची योजना जाहीर करावी. आठवड्याला पीककर्ज वाटपाचा अहवाल जाहीर करण्यात यावा.
सर्व शाखांनी पात्र खातेदारांची यादी तयार करून त्यावर त्वरित कारवाई करावी, अशा मागण्या अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हक्क अबाधित राहावेत,खरीप हंगाम सुरळीत पार पडावा, यासाठी वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांसोबत आहे. आठवडाभरात बँकांनी योग्य कार्यवाही केली नाही,तर वंचित बहुजन आघाडी अग्रणी बँक कार्यालयात ‘मुक्काम पोस्ट आंदोलन’ छेडेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांनी दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव शिवदास कांबळे, महिला उपाध्यक्ष मीना रणीत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
बँकनिहाय कर्ज वाटपाची स्थिती
जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या १३१ शाखा आहेत. या शाखांना एक हजार १८१ कोटी ५० लाख कर्ज वाटपाच्या उद्दिष्ट देण्यात आले. मात्र या शाखांमधून आतापर्यंत केवळ १६०.५४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण केवळ १३.५९ टक्के इतके आहे. खासगी बँकाच्या २६ शाखांमधून १५३.५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले. या बँकांमधून आतापर्यंत केवळ नऊ कोटी ४३ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. हे प्रमाण ६.१५ टक्के इतके अत्यल्प आहे. विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेच्या २६ शाखांमधून १९५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप होणे अपेक्षित असताना या बँकेमधून आतापर्यंत ५६.७७ कोटी कर्ज वाटप करण्यात आले. या बँकेने आतापर्यंत उद्दिष्टाच्या २९.१२ टक्के कर्ज वाटप केले आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ९४ शाखांमधून ६७० कोटींच्या कर्ज वाटपाच्या उद्दिष्ट देण्यात आले आहे. या बँकेने आतापर्यंत १७०.०२ कोटी कर्ज वाटप केले असून, या बँकेची कर्ज वाटपाची टक्केवारी २५.६८ इतकी आहे.