चंद्रपूर : जिल्ह्यात धान, कापसापाठोपाठ सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सध्या सोयाबीन फुलोरा, दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. चांगल्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनवर सध्या काही ठिकाणी पिवळा मोझॅक, तर काही ठिकाणी उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापसावर डोमकळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापसावर डोमकळी येणे म्हणजे गुलाबी बोंडअळीची ही पहिली अवस्था आहे. कापसावर डोमकळीचा प्रादुर्भाव नगण्य असून सोयाबीनवर मोठ्या प्रमाणावर पिवळा मोझॅक आहे. सोयाबीन हे नगदी पीक आहे. याच पिकावर पिवळा मोझॅक, उंटअळीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात धान, सोयाबीन आणि कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन, कापसाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत वाढ होत चालली आहे. खरीप हंगामात सोयाबीन ६६ हजार ९३१ हेक्टरवर, तर कापूस १ लाख ७५ हजार २६९ हजार हेक्टर क्षेत्रावर आहे. जिल्ह्यात जुलै, आगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाला. हा पाऊस या दोन्ही पिकांसाठी पोषक ठरला. सोयाबीन फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. याच अवस्थेत सध्या भद्रावती, वरोरा आणि चिमूर तालुक्यात पेरलेल्या सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला आहे. पिवळा मोझॅक हा बियाण्यांमार्फत पसरतो. विषणूजन्य हा रोग आहे. रोग, कीडीवर औषध आहे. मात्र, या विषाणूजन्य व्हॅायरसवर औषध नाही. यावर उपाययोजना म्हणून बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>>राज्यात गेल्या नऊ महिन्यात वाघाचे आठ बछडे मृत्युमुखी; वाघांची संख्या वाढली, पण मृत्युचे प्रमाणही वाढले

पांढऱ्या माशीमुळे हा रोग होतो. त्यामुळे यावर नियंत्रण करणे आवश्यक आहे. सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने गावागावांत जाऊन जनजागृती करणे सुरू केले आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना केल्या आहे. जिल्ह्यात एक लाख ७५ हजार २६९ हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पीक घेण्यात आले आहे. यापैकी काही भागात कापसावर डोमकळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याचे प्रमाण नगण्य आहे. मात्र, गुलाबी बोंडअळीची ही पहिली अवस्था आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करणे गरजे असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोयाबीनवर पिवळा मोझॅक, उंट अळीचा प्रादुर्भाव आहे. यावर वेळीच नियंत्रण न केल्यास ३० टक्क्यांपासून तर ९० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले.