लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती: मुलगा आणि मुलगी दोघेही अमरावतीतच राहणारे. कुटुंबाच्‍या पुढाकाराने दोघांचेही लग्‍न जमले. धडाक्‍यात त्‍यांचा साखरपुडाही झाला. पण, मुलाने लगेच कारच्‍या नोंदणीसाठी एक लाख रुपये मागितले. मुलीच्‍या वडिलाने भविष्‍याचा विचार करून ती रक्‍कम मुलाला दिली, पण तो समाधानी नव्‍हता. त्‍याने कारच्‍या खरेदीसाठी चक्‍क पंधरा लाख रुपयांची मागणी केली. मुलीच्‍या वडिलांनी त्‍याबाबत असमर्थता दर्शवताच मुलाने लग्‍न मोडले आणि जिवे मारण्‍याची धमकी मुलीला दिली. या प्रकरणी मुलासह त्‍याच्‍या कुटुंबातील तीन सदस्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

विवेक सिद्धार्थ नागदिवे, सिद्धार्थ देवराव नागदिवे आणि एक महिला (तिघेही रा. मनकर्णा नगर, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित मुलीच्‍या वडिलांच्‍या तक्रारीनुसार दोघांचा साखरपुडा झाल्‍याबरोबर मुलाने कारच्‍या नोंदणीसाठी एक लाख रुपयांची मागणी केली, आपण मुलीच्‍या भवितव्‍याचा विचार करून लगेच ही रक्‍कम दिली. त्‍यानंतर गेल्‍या ७ मे रोजी मुलगी तिच्‍या भावासोबत एका मॉलमध्‍ये गेली, तेव्‍हा विवेक त्‍यांना भेटला. विवेकने मुलीकडे नवीन कार घेण्‍यासाठी १५ लाख रुपये मागितले. ही बाब मुलीने वडिलांना सांगितली.

हेही वाचा… अकोला : गोदामाच्या चौकीदाराला धमकावून तब्बल ५० लाखांच्या सिगारेट लंपास; चोरट्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

एवढी मोठी रक्‍कम देण्‍यास वडील असमर्थ आहेत. ती देण्‍यास वडील तयार नाहीत, असे मुलीने विवेकला सांगितल्‍यानंतर तो संतापला. ‘मला जर रक्‍कम मिळाली नाही, तर मी लग्‍न करणार नाही आणि बळजबरीने लग्‍न केलेच, तर तुला जिवानिशी सोडणार नाही,’ अशी धमकीच विवेकने पीडित मुलीला दिली. त्‍यानंतर विवेकने मुलीच्‍या मोबाईलवर लग्‍न मोडल्‍याचा संदेशही पाठवला. मुलीच्‍या वडिलांनी कुटुंबीयांची बैठक घेतली. पुन्‍हा विवेकने कारची मागणी केली. लग्‍न मोडल्‍यामुळे मुलीच्‍या आयुष्‍यावर परिणाम झाल्‍याचे सांगून वडिलांनी फ्रेझरपुरा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth broke up the marriage for the car in amravati mma 73 dvr
First published on: 29-05-2023 at 14:55 IST