बुलढाणा: सोशल मिडीयाचा आणि रिळ बनवण्याचा नाद अनेकदा महागात पडतो.कधीकधी तर  जीवावर बेततो. अशीच एक खळबळजनक अन तितकीच दुर्दैवी घटना आज शेगाव तालुक्यात घडली. रेल्वे लाईनवर उभे राहून रिळ बनवतांना एका युवकाचा रेल्वे खाली आल्याने  मृत्यू झाल्याची घटना  गुरुवारी, ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी घडली.  या दुर्घटनेत त्याचा मित्र देखील गंभीर झाला आहे.मृतकाचे नाव शेख नदीम शेख रफिक असून तो खामगाव तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रहिवासी आहे.  त्याचेसोबत असलेला त्याचा मित्र गंभीर जखमी  आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  शे.नदीम शे.रफिक हा आज दुपारी तालुक्यातील आळसणा गावात लग्नाच्या ‘रिसेप्शन’च्या कार्यक्रमासाठी गेला होता. यावेळी नदीम व त्याच्या मित्राला आळसणा गावालगत असलेल्या रेल्वेलाईनवर रिळ बनविण्याचा मोह सुटला.  रेल्वेलाईनवर  रिळ बनवण्यात मग्न असताना व कानात हेडफोन लावलेले असल्याने रेल्वे आल्याचे नदीमला कळले नाही आणि तो रेल्वेच्या खाली आला. ज्यामुळे त्याला आपल्या प्राणास मुकावे लागले.  नदीमचा मित्र सुध्दा गंभीर जखमी झाला आहे.  त्याचेवर शेगाव येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती शेगाव ग्रामिण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी शे.नदीमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेगाव येथील शासकीय रूग्णालयात आणला होता. या दुर्दैवी घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच समाजमन सुन्न झाले.  नदीमच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.