नागपुरातील बहुचर्चित युग चांडक हत्याप्रकरणात न्यायालयाने शनिवारी राजेश दवारे आणि अरविंद सिंग हे दोघेजण दोषी असल्याचा निकाल दिला. या दोघांना अपहरण आणि हत्येच्या आरोपांखाली दोषी ठरविण्यात आले असून येत्या ३ फेब्रुवारी रोजी शिक्षा सुनावली जाईल.
१ सप्टेंबर २०१४ रोजी युगचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर २ सप्टेंबर २०१४ रोजी संध्याकाळी नागपूर पासून २५ किलोमीटर अंतरावर लोणखैरी गावाजवळ एका निर्जनस्थळी पुलाच्या खाली पाईपमध्ये युगचा मृतदेह सापडला होता. युगचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी राजेश डावरे आणि अरविंद सिंग अशी या दोघांना ताब्यात घेतले होते. यातील राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात अकाऊंटटण्ट म्हणून कामाला होता. मात्र त्याने अकाऊंट्समध्ये काही घोळ केल्याने काही दिवसांपूर्वी त्याला डॉ. चांडक यांनी कामावरून काढले होते. त्याचा राग मनात ठेवून त्याने युगचे अपहरण केल्याचा आरोप होता. राजेशने पैशासाठी किंवा डॉ मुकेश चांडक यांच्यावरील जुन्या रागामुळे आठ वर्षीय युगचे अपहरण करून त्याची हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.