24 November 2020

News Flash

अभाविप’तर्फे उदय सामंत यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न

रविवारी विद्यापीठ परीक्षांचा आढावा घेण्यासाठी सामंत हे नाशिक दौऱ्यावर आले होते

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाजवळ उच्च्च-तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या वाहनाच्या ताफ्यासमोर आंदोलन करताना अभाविपचे कार्यकर्ते.

नाशिक : शैक्षणिक शुल्कात ३० टक्के सवलत द्यावी, शुल्कवाढीवर अंकुश ठेवावा, स्वायत्त विद्यापीठांवर शैक्षणिक शुल्क आणि शैक्षणिक उपक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने समिती नेमावी, आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने रविवारी येथील मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर उच्च-तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न झाला. काळे झेंडे दाखवून उच्च शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याआधी शुक्र वारी जळगाव येथेही अभाविपने सामंत यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न के ला होता. अभाविप राज्यात आपल्या सर्वच दौऱ्यात अशी आंदोलने करत असून त्यांच्या दादागिरीला आपण घाबरणार नसल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नयेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

रविवारी विद्यापीठ परीक्षांचा आढावा घेण्यासाठी सामंत हे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी सामंत हे जात असताना विद्यापीठाच्या रस्त्यावर अभाविपच्यावतीने काळे झेंडे दाखवून मोटार रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी लगेचच कार्यकर्त्यांची धरपकड केली. विद्यार्थी हिताचे निर्णय घेता येत नसतील, तर तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. शिक्षणमंत्री सामंत यांना भेटण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी अटक होत आहे. नाशिकमध्येही तेच घडले. सूडबुध्दिने राजकीय दबावतंत्राचा वापर राज्यात सुरू असल्याचा आरोप अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

अभाविपने दिखाऊ आंदोलने करू नयेत

चर्चा करण्याऐवजी अभाविपकडून चाललेल्या आंदोलनावर उदय सामंत यांनी टिकास्त्र सोडले. जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बैठकीवेळी कडेकोट बंदोबस्त होता. असे असतांना चार-पाच आंदोलक दुचाकीवर घोषणाबाजी करत आले होते. बंदोबस्त असतांना ते कसे प्रवेश करतात, हे आपण गृहमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून देणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. मुळात अभाविपकडून चाललेल्या वाहन रोखण्याच्या आंदोलनाचा सामंत यांनी निषेध केला. आपण वरिष्ठांच्या नजरेत यावे, काहीतरी पद मिळावे म्हणून अभाविपकडून ही आंदोलने सुरू असल्याची खिल्ली त्यांनी उडविली. अभाविपच्या दादागिरीला आपण घाबरणार नाही. संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नयेत. त्यामुळे युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. मात्र अभाविपने दिखाऊ आंदोलने करू नयेत, असा टोला सामंत यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 12:12 am

Web Title: abvp activists attempt to block car of uday samant zws 70
Next Stories
1 मराठा आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा – भुजबळ
2 नाशिक विभागात सव्वालाखापेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त
3 नाशिक जिल्ह्यात ४८ हजारहून अधिक रुग्ण करोनामुक्त
Just Now!
X