शेतमालाची जलद आणि सुरक्षित वाहतूक

नाशिक : जिल्ह्य़ातील कांदा, द्राक्षांसह इतर कृषिमालाच्या जलद आणि सुरक्षित वाहतुकीसाठी शुक्रवारपासून देवळाली कॅम्प स्थानकापासून कृषी रेल्वे सुरू होत आहे.  यामुळे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना अवघ्या काही तासांत राज्यातील आणि राज्याबाहेरील बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे

जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर कांदा तसेच द्राक्ष उत्पादन होत आहे. कांदा आणि द्राक्षास देशात आणि देशाबाहेरूनही मागणी असते. उत्पादित शेती मालाच्या विक्रीसाठी जलद आणि सुरक्षित वाहतूक होणे गरजेचे असल्याने नाशिक हे निर्जतूक तसेच वातानुकूलित बोगींची व्यवस्था असलेल्या कृषी रेल्वेने जोडावे, यासाठी खासदार गोडसे यांनी पाठपुरावा केला आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी हा प्रश्न मांडला होता. जिल्ह्य़ात कांदा, द्राक्षांबरोबर भात आणि पालेभाज्यांचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणावर निघते. उत्पादित मालाची जलद वाहतूक आणि विक्रीसाठी योग्य बाजारपेठ सहज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी रेल्वे गाडयांमध्ये वातानुकूलीत साठवणूक व्यवस्था उपलब्ध असलेल्या बोगींची अत्यंत आवश्यकता असल्याचे मत गोडसे यांनी संसद अधिवेशनात मांडले होते.

शुक्रवारपासून पहिली कृषी रेल्वे देवळाली स्थानकातून सुटणार आहे. ही कृषी रेल्वे मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱ्हानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूरमार्गे दानापूर अशी धावणार आहे.

या कृषी रेल्वेचे भाडेही इतर नियमित मेल आणि एक्स्प्रेस गाडय़ांच्या भाडय़ापेक्षा कमी असेल. या कृषी रेल्वेमुळे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना अवघ्या काही तासांत राज्यातील तसेच राज्याबाहेरील बाजारपेठ उपलब्ध होणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाला चालना मिळणार असल्याचा दावा गोडसे यांनी केला आहे.