‘सावाना’ पदाधिकाऱ्यांची नाराजी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर यांच्या नगरीत आयोजित करण्यासाठी सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) संस्थेने केलेले शर्थीचे प्रयत्न अखेर काहीसे तोकडे पडले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सर्व पर्यायांचा विचार करीत उस्मानाबादला संमेलन आयोजक म्हणून मान दिल्याने ‘सावाना’सह नाशिककरांचा अपेक्षाभंग झाला.

जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळाकडे नाशिकसह लातूर, उस्मानाबाद, बुलढाणा येथील प्रस्ताव होते. मराठवाडय़ातील उस्मानाबाद येथे २०१४ मध्ये संमेलन होणार, असे निश्चित झाले असतांना आणि त्या दृष्टीने आयोजकांकडून तयारीही करण्यात येत असतांना महामंडळाने आपला परीघ विस्तारत ‘अखिल भारतीयत्व’ सिद्ध करण्यासाठी पंजाब येथील घुमान येथे संमेलन भरविले. परिणामी उस्मानाबाद येथे संमेलन ही चर्चाच ठरली होती.

या वेळी त्यामुळेच उस्मानाबादचे पारडे जड राहील अशी चर्चा साहित्यिक वर्तुळात होती. या प्रस्तावाच्या गर्दीत आपले वेगळेपण जपण्यासाठी ‘सावाना’च्या वतीने शर्थीचे प्रयत्न झाले. महामंडळाला रीतसर निमंत्रण देत प्राथमिक स्वरूपात वाचनालयाकडून संमेलन नाशिक येथे झाल्यावर काही आर्थिक भार उचलण्यासह नियोजनाची जबाबदारी पेलण्याची तयारी दर्शविली. संमेलन स्थळाच्या जागा, त्या ठिकाणी लहान आणि मोठे सभागृह कोठे राहील, पुस्तक प्रदर्शन कुठे भरवायचे, साहित्य प्रदर्शन, ज्यांना प्रदर्शनाचे कक्ष परवडत नाही, त्यांना संमेलनस्थळाच्या आवारात टेबल कुठे देता येतील, जेवणाची व्यवस्था काय असेल असा सर्व विचार करता त्यासाठी एक कोटी ३० लाख रुपयांचा खर्च होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

महामंडळाच्या स्थळ निवड समितीने नुकतीच शहरातील चार ठिकाणांची पाहणी केली होती. शहरातील विस्तृत आकाराचे ठक्कर डोम हे सभागृह संमेलनासाठी योग्य राहील, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले-पाटील यांनी मांडल्यावर ‘सावाना’ पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु, त्याच वेळी पाटील यांनी याबाबत अंतिम निर्णय महामंडळाच्या बैठकीतच होईल, असे नमूद केले होते. दरम्यान, आयोजकांच्या शर्यतीतून लातूर, विदर्भ बाद झाले. शेवटच्या क्षणापर्यंत नाशिक आणि उस्मानाबाद या शहरांच्या प्रस्तावांवर महामंडळाने विचार करून आपले दान उस्मानाबादच्या बाजूने टाकले. त्यामुळे नाशिककरांचा अपेक्षाभंग झाला.

उस्मानाबादचा या संमेलनासाठी आग्रह होता आणि मागील अनुभव लक्षात घेता तो रास्तही होता. त्या भागातील दुष्काळ किंवा अन्य काही कारणांमुळे हे संमेलन नाशिकला होईल, अशी अपेक्षा असल्याने आपण प्रस्ताव पाठविला होता. आता जानेवारी २०२१ मध्ये होणारे साहित्य संमेलन नाशिक येथेच व्हावे, यासाठी कसून प्रयत्न करण्यात येणार आहेत. उस्मानाबाद येथे होणाऱ्या संमेलनास ‘सावाना’चे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे ‘सावाना’चे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगांवकर यांनी सांगितले.

नाशिककरांचा विरस

कुसुमाग्रजांच्या नगरीत आमच्या नाशिकला यंदा साहित्य संमेलन होईल, अशी आशा लावून बसलो होतो. संमेलन उस्मानाबादला होणार असल्याने नाशिककरांचा विरसच झाला आहे. आजवर साहित्य संमेलन पाहिले ते माध्यमांवरच. परंतु, ते नाशिकमध्ये झाले असते तर अनुभवयालाही मिळाले असते. माझ्यासारख्या नवागतांना ग्रंथदिंडी आणि विविध उपक्रमांसह गौरवशाली परंपरेची कावड वाहता आली असती पण, तूर्तास उस्मानाबाद येथे होणाऱ्या संमेलनाची वाट पाहू.    – यशश्री रहाळकर (गृहिणी)