राज ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा विषय बराच काळ रेंगाळला असताना नाशिकमध्ये मनसेने हा विषय आगामी महापालिका निवडणुकीआधी मार्गी लावण्यात आघाडी घेतली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राज्यातील पहिल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी सायंकाळी ७ वाजता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे असणाऱ्या शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे दालन, शिवाजी महाराज यांच्या जीवन प्रवासावरील चित्रे आणि शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी चितारलेली व्यंगचित्रे.. ही या स्मारकाची वैशिष्टय़े ठरणार आहेत. महापालिका निवडणुकीआधी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची उभारणी करत मनसेने शिवसेनेलाही अप्रत्यक्षपणे शह देण्याची व्यूहरचना केली आहे.

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेतील अनेकांवर टीकास्त्र सोडले होते. तथापि, शिवसेनाप्रमुखांविषयी त्यांचे ममत्व कायम राहिले. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर स्मारकाचा विषय पुढे आला. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्या ठिकाणी स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात बराच कालापव्यय झाला. त्यात वेगवेगळ्या परवानग्यांचा अडसर असल्याने मुंबईत या कामाचा श्रीगणेशाही झालेला नाही. या स्थितीत बाळासाहेबांच्या निधनानंतर मनसेने महापालिकेतर्फे नाशिकमध्ये शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याचे राज यांनी जाहीर केले होते. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन त्याच स्वरूपाचे हे स्मारक असेल असे राज यांनी नेहमी म्हटले होते. या स्मारकात ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे संग्रहालय स्थापन करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. त्यासाठी शिवशाहिरांनी आपल्याकडील दुर्मीळ व ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचा साठा, दस्तावेज उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली. या अनुषंगाने  प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्णत्वास नेण्याची धडपड मनसेने केली. शस्त्रास्त्रांच्या दालनात ढाल, तलवारी, दांडपट्टे, खंजीर, कटय़ार अशा जवळपास ५०० विविध शस्त्रास्त्रांचा संग्रह राहणार आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी रेखाटलेली चित्रे पाहावयास मिळतील.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी ओळख म्हणजे व्यंगचित्रकार. त्यांनी रेखाटलेली अनेक व्यंगचित्रे गाजली आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांचा खजिना या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर, स्मारकाचे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकारचे सद्यस्थितीत राज्यात शिवसेनाप्रमुखांचे कुठेही स्मारक नाही. निवडणुकीआधी त्याचे लोकार्पण झाल्यास हा मुद्दा नाशिकसह मुंबईतही प्रचारात कामी येईल, असे मनसेने गृहीत धरले आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी सात वाजता या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी मनसेने पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान, संगीतमय कारंजा, वाहतूक बेट आदींचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण केले होते. लगोलग शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

स्मारकाची वैशिष्टय़े

राज्यातील पहिले स्मारक

५०० शस्त्रास्त्रांचे दालन

सेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांचा खजिना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या  जीवनप्रवासावरील चित्रे