उत्तर महाराष्ट्रातील तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. रणरणत्या उन्हात राजकीय वातावरणही तापले असून जामनेर नगरपालिका, जळगाव महापालिकेबरोबर आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्ष आपला खुंटा मजबूत करण्याच्या तयारीला लागले आहेत. चार वर्षांत पराभवाचे अनेक चटके सोसल्यावर विरोधकांना भाजपचा विजय रथ रोखण्यासाठी आघाडीची अपरिहार्यता लक्षात आली. ही मंडळीएकजूट करीत असताना सत्ताधारी भाजपमध्ये मात्र दुफळी माजली आहे. सत्तेचा सोपान चढल्यावर अनेक वाटेकरी होतात. शह-काटशह, कुरघोडीचे राजकारण सुरू होते. जळगावमध्ये एकनाथ खडसे-गिरीश महाजन यांच्यात आधीपासून वितुष्ट असताना धुळ्यात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे- आ. अनील गोटे यांच्यातील मतभेद टोकदार बनले आहेत. नाशिकमध्ये भाजप आमदार-पदाधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. महापालिकेतील सत्ताकारणात गटातटाचे राजकारण पक्षाला मारक ठरत आहे.

काँग्रेसच्या सत्ताकाळात पक्षांतर्गत मतभेदांचे वारंवार दर्शन घडायचे. अनेकदा हे कलह आरोप-प्रत्यारोपापर्यंत मर्यादित न राहता हाणामारीपर्यंत जात. त्या वेळी पक्षाचे नेते हे हाणामारीच्या घटना म्हणजे काँग्रेसच्या जिवंतपणाचे लक्षण असल्याचे सांगून पांघरूण घालायचे. ‘हात दाखवून अवलक्षण’ असाच हा प्रकार. परस्परांचे पाय खेचण्यास कोणतीच कसर न ठेवणाऱ्या काँग्रेस जनांमुळे या पक्षाला पराभूत करण्यासाठी विरोधकांची देखील गरज नाही, अशी प्रतिक्रिया उमटायची. सत्तेची ऊब मिळविण्यासाठी अविरत चाललेल्या वादात त्यांना सर्व काही गमवावे लागले. केंद्रासह राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळविणाऱ्या भाजपचे उत्तर महाराष्ट्रात झपाटय़ाने काँग्रेसीकरण होत आहे. अंतर्गत कलह मिटविण्याऐवजी उलट आगीत तेल ओतण्याचे काम पद्धतशीरपणे होत आहे. नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. महापालिकेतही पक्षाची सत्ता. तिन्ही आमदार अनेकदा नगरसेवक राहिल्यामुळे कदाचित त्यांची महापालिकेतील ओढ काही संपत नाही. सुमारे १२०० कोटीचे अंदाजपत्रक असणाऱ्या महापालिकेवर प्रत्येकाला आपलाच अंकुश हवा आहे. त्यासाठी सुप्त संघर्ष सुरू असतो. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असणारे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप हे अन्य महिला आमदार तसेच पदाधिकाऱ्यांना धूप घालत नाही. यामुळे त्यांच्या विरोधातील रोष वारंवार प्रगट होतो. स्थायी सभापतिपदासाठी नाव निश्चित करताना काही नाराज नगरसेवकांनी त्यांना खडेबोल सुनावले. शहराध्यक्षांच्या कार्यपद्धतीविषयी महिला आमदारांमध्ये खदखद आहे. आ. प्रा. देवयानी फरांदे आणि प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते, आ. सीमा हिरे आणि सभागृह नेते दिनकर पाटील गटातील कलह मिटण्याची आशा पक्षाने सोडून दिली आहे. धुमसणारे वाद, मतभेद अनेकदा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले. संबंधितांनी तोडगे काढून ते मिटविण्याचे प्रयत्न केले. परंतु, हे तोडगे दुसऱ्या गटाला मान्य होत नसल्याने वादाची मालिका कायम आहे. या स्थितीत ‘दत्तक नाशिक’मध्ये बदल घडणे अवघड बनले. महापालिकेच्या कारभारात लुडबुड करणाऱ्या पक्षीय नेत्यांना चपराक लगावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अखेर आयुक्तपद तुकाराम मुंढे यांच्यासारख्या खमक्या अधिकाऱ्याकडे सोपवावे लागले.

खडसे-महाजन वादाचा लाभ उठविण्यासाठी आघाडी

जळगाव भाजपमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे-गिरीश महाजन यांच्यातील वितुष्ट वाढत आहे. विधिमंडळ अधिवेशनात खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपवर पुन्हा शरसंधान साधल्याने त्यांच्या गटात संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे किसान सभेच्या मुंबईत धडकलेल्या मोर्चात महाजन यांनी यशस्वी मध्यस्थी केली. हा धागा पकडून त्यांचे समर्थक राज्यपातळीवर खडसे यांना पर्याय म्हणून महाजन यांच्याकडे पाहिले जात असल्याची दवंडी पिटत आहे. दुभंगलेली मने सांधण्याची शक्यता लोप पावली आहे. काँग्रेसच्या राजकारणात कोणा एकाला काम करण्यास मुक्त वाव दिला जात नाही. समांतर पर्याय ठेवून त्याच्या कामात खोडा घालण्याचे काम नेटाने केले जाते. पक्षश्रेष्ठींचा त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा मिळतो. काँग्रेसची संस्कृती भाजपमध्ये रुजली आहे. भाजपमधील अंतर्गत कलहाचा लाभ उठवण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवले. त्याचे श्रेय पक्षांतर्गत बदललेल्या समीकरणाने महाजन गट घेतो. महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जामनेर तालुक्यात त्यांच्यासह भाजपला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आहेत. जामनेर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या निर्णयाने भाजपच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

डॉ. सुभाष भामरे-अनील गोटे वाद पराकोटीला

शेजारील जिल्ह्य़ांकडून मिळालेला वारसा नेटाने पुढे नेण्याचा विडा धुळे जिल्हा भाजपने उचलला आहे. या ठिकाणी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि आ. अनिल गोटे यांच्या दोन गटात पक्ष विभाजित झाला आहे. दोन्ही गट परस्परांवर कुरघोडीची संधी दवडत नाहीत. या वादात पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप सुटका झालेला भारतीय लष्करी जवान चंदू चव्हाणलादेखील ओढण्यात राष्ट्रभक्तीचे धडे देणाऱ्या भाजपच्या लोकप्रतिनिधीला कमीपणा वाटला नाही. आपल्या मतदारसंघातील जवानाच्या सुटकेसाठी डॉ. भामरे यांनी प्रचंड शक्ती खर्च केली होती. भामरे यांच्यावरील रोष गोटे यांनी जवानावर केलेल्या आरोपातून समोर आला. दोन्ही नेत्यांमधील वितुष्ट वाढण्यामागे आगामी धुळे विधानसभा निवडणुकीचे कारण आहे. केंद्रात न रमलेले भामरे राज्यात परततील आणि त्यांच्यामार्फत धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची निवड केली जाईल, ही शक्यता गृहीत धरून विद्यमान आमदार गोटेंकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे. भामरे गटही गोटेंना वेसण घालण्यासाठी भाजपचे विरोधक राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसशी हातमिळवणी करीत असल्याचा आक्षेप आहे. धुळे महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांच्या मदतीने भामरे हे आपल्या विकासकामांमध्ये खोडा घालण्याचे काम करीत असल्याची गोटे यांची तक्रार आहे. स्थानिक नेते परस्परांविरोधात शड्डू ठोकून जणू पक्षाला संपविण्याची तयारी करीत आहेत.