प्रतितास १० ते २० हजार प्रवासी वहनक्षमता

नाशिक : मेट्रोची वहनक्षमता तासाला ४० हजार प्रवासी असून  सुवर्ण त्रिकोणातील एक कोन असणाऱ्या नाशिकमधील कोणत्याही रस्त्यावर तासाला इतके प्रवासी प्रवास करीत नाही. या पाश्र्वभूमीवर, महामेट्रोने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी ‘मास रॅपिड ट्रान्झिस्ट’ (एमआरटीएस) व्यवस्थेची संकल्पना मांडली आहे. जगातील हा वेगळा प्रयोग असून त्यात मेट्रो, बीआरटी, ट्राम आणि इलेक्ट्रिक बस यांचा संयोग असणारी तीन कोच अर्थात डब्याची बस ट्रामसारखी व्यवस्था घडविण्यात येणार आहे. या व्यवस्थेची प्रतिताशी १० ते २० हजार इतकी प्रवासी वहन क्षमता आहे.

सद्य:स्थितीत नाशिकची लोकसंख्या २० लाखांच्या घरात आहे. एसटी महामंडळाने शहरात सेवा सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविल्याने महापालिकेने ती जबाबदारी स्वीकारली आहे. पालिकेची बससेवा कार्यान्वित होण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शहरात चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात घोषणा केली होती. मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नाशिकची लोकसंख्या बरीच कमी आहे. कोणत्याही रस्त्यावर प्रतितास ४० हजार नागरिक प्रवास करीत नाहीत. यामुळे मेट्रोऐवजी अन्य पर्यायांवर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी सरकारने महामेट्रो आणि सिडकोवर सोपविली. त्या अंतर्गत शहराची सध्याची आणि पुढील २० वर्षांची गरज लक्षात घेऊन एमआरटीएस अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

महामेट्रोने एमआरटीएस उभारण्यास सकारात्मकता दाखवली आहे. या एमआरटीएसचा खर्च कमी असून त्याची प्रवासी वाहनक्षमता नाशिकच्या वाहतुकीला पूरक आहे. ही एमआरटीएस प्रतिताशी दहा ते २० हजार प्रवासी वाहतुकीला सक्षम आहे.

या व्यवस्थेला कोणत्याही प्रकारच्या रेल्वेची आवश्यकता नाही. यामुळे खर्चात बचत होऊन सक्षम अशी व्यवस्था तयार होईल, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. या व्यवस्थेसाठी जी मार्गिका असेल, तेथून इलेक्ट्रिक बसही धावू शकतात. महापालिकेच्या बससेवेत निम्म्या बस इलेक्ट्रिक घेण्याचा मानस आहे. भविष्यात या मार्गिकेचा उपयोग इलेक्ट्रिक बसला होण्याची तजवीज आहे.

अशी असेल बस ट्राम

एमआरटीएस हा अनोखा प्रयोग ठरणार आहे. मेट्रो, बीआरटी, ट्राम आणि इलेक्ट्रिक बस यांचा योग्य तो संयोग असणारी तीन डब्यांची (एकमेकांतर्गत जुळणारी) बस ट्राम व्यवस्था घडविण्यात येणार आहे. बस ट्रामला टायर असणारे डबे असतील. ही कोच व्यवस्था रेल्वेसारखी छतावरील विद्युत वाहिकेतील ऊर्जा घेत आणि बीआरटीसारख्या मार्गावरून चालेल. ही कोच व्यवस्था पूर्णपणे वातानुकूलित असेल. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेल. शहराच्या मुख्य भागात उन्नत मार्गाने तर इतर ठिकाणी या सेवेची मार्गिका रस्त्याच्या पातळीवर असेल. या सेवेच्या मार्गिकांमध्ये शहर बस (इलेक्ट्रिक बस) धावू शकतील. या मार्गिकेतून धावू शकणाऱ्या बसेसच्या टपावरील तारेमधून बसची बॅटरी चार्ज केली जाईल. या पद्धतीने वर्तुळाकार फिडर सेवा या एमआरटीएसला पूरक निर्माण केल्या जातील.