अनिकेत साठे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन यंदा सिंहस्थनगरीत होत असून करोना काळात होणाऱ्या या संमेलनात नियम पालनासाठी करावे लागणारे विविध उपाय कळीचा मुद्दा ठरत आहेत. संमेलनस्थळाचे वारंवार निर्जंतुकीकरण, स्वच्छतेसाठी व्यवस्था, सहभागी होणाऱ्यांची चाचणी, साहित्यिकांसाठी स्वतंत्र निवास, वाहतूक व्यवस्था आदी कारणांस्तव संमेलन खर्चात मोठी वाढ होणार आहे.

करोनाच्या संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीत निधी संकलनाचे आव्हान पेलण्यासाठी संयोजकांनी विविध मार्ग धुंडाळण्यास सुरुवात केली आहे. शहरातील गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात २६ ते २८ मार्च या कालावधीत मराठी साहित्य संमेलन होत आहे. टाळेबंदीचे बहुतांश निर्बंध शिथिल झाले आहेत. परंतु सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थितीबाबत ५० टक्के  उपस्थितीचे निर्बंध आहेत. संमेलनाची घटिका समीप येईपर्यंत ते शिथिल होतील, अशी लोकहितवादी मंडळाची अपेक्षा आहे.

साहित्य महामंडळाकडून पदाधिकारी, साहित्यिक असे साधारणत: पावणे दोनशे मंडळी येतील. ग्रंथ प्रदर्शनात दोन कक्षातील अंतर कमी करण्यास शासनाने संमती दिल्यास ४०० प्रकाशकांना जागा उपलब्ध करण्याचा मानस आहे.

संमेलनस्थळाची एकूण १० हजार खुच्र्याची क्षमता आहे. करोनाच्या नियमावलीनुसार सध्या पाच हजार खुच्र्याचे नियोजन केले जाईल.  निर्जंतुकीकरण, मुखपट्टी वा तत्सम बाबींची पूर्तता यंदा करावी लागणार असल्याकडे संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी लक्ष वेधले. संमेलनात सहभागी होणाऱ्यांसाठी करोना चाचणीची व्यवस्था केली जाणार आहे. संमेलनाचे राज्यातील सहा शहरात थेट प्रक्षेपण करण्याचे नियोजन आहे. या सर्वाची परिणती, संमेलनात वाढीव खर्चाचा भार पडणार आहे.

संमेलनात भोजन, निवास, वाहतूक व्यवस्थेचा अधिक खर्च असतो. साहित्यिकांच्या निवासासाठी स्थानिक पातळीवर ज्यांच्याकडे सर्व सुविधांनी युक्त अशा निवास खोल्या, शेतघरे आहेत, त्यांच्याकडून त्या नि:शुल्क घेतल्या जातील. संमेलनात प्रत्येक दिवसाच्या भोजनाचे यजमानपद इच्छुकांना दिले जाईल. त्यास भुजबळ नॉलेज सिटी, संदीप फाऊंडेशन या संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

जगातील मराठी मंडळांचे आर्थिक साहाय्य घेण्याचा मानस आहे. जगात कुठेही असणाऱ्या मराठी साहित्यिक, भाषिक व्यक्तींच्या ध्वनिचित्रफिती संमेलनात प्रक्षेपित करण्याचे नियोजन आहे. स्वागत समितीच्या सदस्यत्वासाठी पाच हजार रुपयांचे शुल्क ठेवण्यात आले आहे. संमेलनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेच्या जाहिरातीतून निधी मिळविण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी बँका आदींकडून देणग्या मिळवल्या जातील.

विविध पर्यायांवर विचार..

या संमेलनाचे अंदाजपत्रक सुमारे दोन ते अडीच कोटींहून अधिकवर जाण्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य शासनाकडून साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. करोना काळात उद्योग-व्यवसायावर परिणाम झालेला असल्याने निधी संकलनात संयोजकांचा कस लागणार आहे. त्यासाठी विविध पर्यायांवर विचार सुरू आहे. संमेलनात कोणत्या बाबीसाठी किती खर्च येईल, याची माहिती सध्या घेतली जात असून अंदाजपत्रक नेमके किती असेल हे स्पष्ट झालेले नसल्याचे संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.