News Flash

केंद्रीय रेल्वे कार्यशाळेत करोनाचा शिरकाव

मनमाड शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत करोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.

संग्रहीत

मनमाड : येथील केंद्रीय रेल्वे अभियांत्रिकी कार्यशाळेत करोनाचा शिरकाव झाला आहे. काही दिवसांत पाच ते सहा अधिकारी, कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने करोनाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारी रेल्वे कार्यशाळेचे काम बंद ठेवण्यात आले. यापुढे ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यशाळेत कामकाज होईल. ग्रामीण भागात जवळपास दीड हजार रुग्ण उपचार घेत आहेत.

मनमाड  शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत करोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शनिवार, रविवारी टाळेबंदीसह अनेक निर्बंध लागू केले आहेत. येथील केंद्रीय अभियांत्रिकी रेल्वे कार्यशाळेत गेल्या काही दिवसांत पाच ते सहा कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमी  वर, प्रशासनाने मंगळवारी कार्यशाळेतील कामकाज बंद ठेवले. बुधवारपासून दोन पाळ्यांत ५० टक्के कर्मचारी क्षमतेने कामकाज होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान नांदगाव तालुका हा करोनाचा केंद्रबिंदू ठरला असून बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागात दीड हजार रुग्ण

नाशिक शहराप्रमाणे ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या अहवालावरून सध्या नाशिक महापालिका क्षेत्रात सहा हजार ७३१, मालेगाव महापालिका क्षेत्रात ६६४ तर ग्रामीण भागात १४०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीणमध्ये ११८, चांदवड ९७, सिन्नर १७१, दिंडोरी ७३, निफाड २५३, देवळा ५७, नांदगाव २३०, येवला ११४, त्र्यंबकेश्वर ५९, सुरगाणा सहा, पेठ तीन, कळवण २९, बागलाण ९५, इगतपुरी २६, मालेगाव ग्रामीण ७७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३४  हजार ९६६ रुग्ण आढळले. त्यातील एक लाख २३ हजार ९२३ रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत दोन हजार १७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ९४.१४ टक्के, नाशिक शहरात ९१.१७ टक्के, मालेगावमध्ये ८६.३५ टक्के तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.०२ टक्के आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९१.८२ टक्के इतके आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:06 am

Web Title: corona virus involvement in central railway workshop akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आदिवासी भागातील टंचाईमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम
2 नमुने तपासणीत लवकरच खासगी प्रयोगशाळांशी स्पर्धा
3 जळगाव महापौर निवडणुकीशी नाशिकचाही संबंध
Just Now!
X