कोणत्याही बँकांतून एकदाच दोन हजार रुपये बदलता येणार;  बहुतांश ‘एटीएम’ बंदच

निश्चलनीकरणानंतर गेल्या काही दिवसांपासून उडालेला चलनकल्लोळ १२ व्या दिवशीही कायम असला तरी सोमवारी बहुतांश बँकांमध्ये पैसे बदलण्यासाठी होणारी गर्दी काहीशी ओसरल्याचे पाहावयास मिळाले. कोणत्याही नागरिकाला एकदाच कोणत्याही बँकेच्या शाखेतून पैसे बदलून मिळणार आहेत. काही सहकारी बँकांमध्ये खातेदाराला दोन हजार अथवा ५०० इतकीच रक्कम काढण्याचे बंधन घालण्यात आल्याची तक्रार खातेदारांनी केली. नोट बदलण्याची मर्यादा कमी केल्यामुळे आपलेच पैसे बदलण्यासाठी संपूर्ण कुटुंबीयांना रांगेत तिष्ठत राहावे लागणार असल्याची भावना आहे. जिल्हा प्रशासनाने सूचित केल्यानुसार जिल्ह्यातील सर्व एटीएम केंद्र सोमवारी सुरू करण्यात बँकांना अपयश आल्याचे चित्र आहे. बाजार समितीत कृषिमालाचे लिलाव पूर्ववत झाले असून धनादेशाची रक्कम शेतकऱ्यांना लवकर हाती पडेल याची जबाबदारी सुविधा केंद्रांवर सोपविली गेली आहे.

[jwplayer zkvFlBpu]

१२ दिवसांपूर्वी ५०० व एक हजारच्या नोटा रद्दबातल झाल्याची घोषणा झाल्यानंतर नागरिकांमध्ये उडालेला गोंधळ अद्याप कायम आहे. या निर्णयात विविध स्वरूपाचे बदल केले जात आहे. नोटा बदलण्याची मर्यादा केवळ दोन हजार केल्यामुळे बँक वा टपाल कार्यालयात कितीवेळा खेटा मारणार, असा प्रश्न नागरिक विचारतात. सोमवारी बँक उघडण्याच्या आधी बाहेर रांगा लागलेल्या होत्या. परंतु, व्यवहार सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी रांगा पाहावयास मिळाल्या नाही. ज्या ठिकाणी बँक खाते असेल तिथेच नोटा बदली करून मिळतील, असा संभ्रम असल्याने त्याचा गर्दीवर परिणाम झाल्याचे सांगितले जाते. परंतु, वास्तवात तसा कोणताही नियम नाही. सर्वसामान्य नागरिक बँक खाते नसेल तरी कोणत्याही बँकेतून आपले चलन बदलून घेऊ शकतो. काही बँकांमध्ये नोटा बदल, खात्यातून पैसे काढणे व भरणे यासाठी गर्दी पाहावयास मिळाली. बँकांकडे असणाऱ्या चलनात १०० व ५० च्या नोटांचे प्रमाण कमी आहे. दोन हजाराच्या नोटा अधिक असल्याने ग्राहकांना वेगवेगळे अनुभव येत आहे. सहकारी बँकेत खाते असणारा ग्राहक पैसे काढण्यासाठी बँकेत गेला असता त्याला १०० रुपयांच्या नोटा हव्या असल्यास ५०० तसेच दोन हजाराची नोट हवी असल्यास दोन हजार रुपये काढता येतील, असे सांगण्यात आले. यामुळे १०० च्या नोटा असूनही पैसे काढण्यावर बँकेतील कर्मचारी अशी बंधने टाकत असल्याची तक्रार ग्राहकाने केली.

बँकांसमोरील रांगा कमी करण्यासाठी एटीएम तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना दिले होते. एटीएम यंत्रणेत आवश्यक ते बदल तातडीने करण्यास सांगण्यात आले. परंतु, ही प्रक्रिया सोमवापर्यंत पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यामुळे शहरातील अनेक एटीएम बंद होते. काही विशिष्ट बँकांच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध असले तरी तिथे भल्यामोठय़ा रांगा लागलेल्या आहेत. पैसे लवकर संपुष्टात येत असल्याने रांगेतील प्रत्येकाला पैसे मिळतील याची शाश्वती नाही. जिल्ह्यात विविध बँकांची एकूण ९०० एटीएम आहेत. त्यातील निम्मी तरी कार्यान्वित झाली काय, असा प्रश्न त्रस्तावलेले ग्राहक विचारत आहेत.

अभियंत्याच्या अभावामुळे एटीएम कार्यान्वित होण्यास विलंब

बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आठवडय़ाला २० वरून २४ हजार इतकी वाढविली गेली आहे. परंतु, ही रक्कम काढायची म्हटली तरी ग्राहकाला आठवडय़ातून तीन वेळा बँकेत खेटा माराव्या लागतील. कारण, एकावेळी दहा हजार रुपये दिले जातात. म्हणजे उपरोक्त रक्कम काढण्यासाठी वारंवार जावे लागेल, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. एटीएम सुरू झाल्यास ग्राहकांचा त्रास काही अंशी कमी होईल, असा अंदाज आहे. संबंधित यंत्रणेत आवश्यक ते बदल करण्यासाठी पुरेसे अभियंते नाहीत. काही बँकांचे एटीएमचे व्यवस्थापन व संचालनाचे काम मध्यवर्ती कार्यालयामार्फत चालते. यामुळे सर्व एटीएम कार्यान्वित होण्यास आणखी काही कालावधी जाणार असल्याचे दिसत आहे.

[jwplayer 1yLms27W]