खा. हेमंत गोडसे यांची संसदेत मागणी

नोटांसाठी लागणाऱ्या १८ हजार मेट्रिक टन कागद निर्मितीचे उद्दिष्ट अद्याप बाकी असून त्यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे. उपरोक्त पेपर मिल प्रकल्पासाठी नाशिक योग्य ठिकाण आहे. येथे सीएनपी आणि आयएसपीची २५० एकर जागा रिक्त आहे. तसेच मुद्रणालयाच्या एक हजार सदनिका रिक्त आहेत. यामुळे या प्रकल्पाची जागा व सदनिका मोफत मिळणार असल्याने किंमत कमी होईल. या सर्व बाबींचा विचार करून अर्थखात्याने नाशिक येथे पेपर मिल कारखाना उभारण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी खा. हेमंत गोडसे यांनी संसदेत केली.

केंद्र सरकारला बँक नोटेसाठी दरवर्षी किमान ४८ हजार मेट्रिक टन कागद लागणार आहे. त्यातील सहा हजार मेट्रिक टन कागदाची निर्मिती होशंगाबाद येथे होत असून म्हैसूर येथे प्रतिवर्ष १२ हजार मेट्रिक टन कागद निर्मिती क्षमतेचा कारखाना उभारण्यात येणार आहे. दोन नव्या यंत्रणांमार्फत होशंगाबाद येथे १२ हजार मेट्रिक टन कागद निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित १८ हजार मेट्रिक टन कागदाची गरज पूर्ण करणे अद्याप बाकी असून त्यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे. या संदर्भात गोडसे यांनी मध्यंतरी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. या प्रकल्पासाठी नाशिकची जागा कशी संयुक्त व योग्य आहे ही बाब त्यांनी पटवून दिली. आयएसपी व सीएनपीच्या मालकीची नाशिक रोड परिसरात ३५० एकर जागा आहे. त्यातील २५० एकर जागा रिकामी आहे. तसेच या ठिकाणी एक हजार सदनिकाही रिक्त आहेत. ही जागा व सदनिका प्रकल्पासाठी मोफत स्वरूपात उपलब्ध होईल. दोन्ही मुद्रणालयास लागणारा कागद स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्यास वाहतूक खर्चही शून्य होईल. या प्रकल्पासाठी गोदावरी व दारणा नदीतून पाण्याची उपलब्धता करता येईल. कागदासाठी लागणाऱ्या कापसाची महाराष्ट्रात उपलब्धता आहे. या सर्वाचा विचार करून कागदाचा कारखाना नाशिक येथे उभारण्यास निर्देश द्यावेत, अशी मागणी गोडसे यांनी केली.