नीलेश पवार/ चारुशीला कुलकर्णी

देशात लागू झालेल्या संचारबंदीमुळे जेवणाचे हाल होत असल्याने नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी धुळे ते अक्कलकुवा असा १३१ किलोमीटरचा सायकल प्रवास करत आपले घर गाठले. शिक्षणासाठी धुळ्यात असलेल्या या विद्यार्थ्यांना हे अंतर गाठण्यासाठी १२ तास लागले. दुसरीकडे नाशिकमध्ये सुमारे एक हजार मजूर वेगवेगळ्या भागांत अडकून पडले आहेत.

देशव्यापी संचारबंदीमुळे अनेक विद्यार्थी, कामगार आपल्या घरांपासून दूर अडकले आहेत. विद्यार्थ्यांची ‘मेस’ बंद झाल्याने त्यांच्या जेवणाचे प्रचंड हाल होत असल्याने ते कोणत्याही मार्गाने घरी परतण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जात आहे. याचेच उदाहरण या सायकल प्रवासातून समोर आले. धुळ्यात शिक्षणासाठी थांबलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील विद्यार्थ्यांना आपले घर गाठण्यासाठी सायकलचा आधार घ्यावा लागला. अक्कलकुवा तालुक्यातील दिलीप तडवी, विकास वसावे आणि त्याचे इतर तीन मित्र परीक्षेच्या तयारीसाठी धुळे येथे खोली घेऊन राहत होते. संचारबंदीनंतर मेस बंद झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. त्यांना गावी परतण्यासाठी बस मिळाली नाही. या विद्यार्थ्यांनी महामार्गावर उड्टो राहून काही मालमोटार चालकांची विनवणी केली. मात्र त्यांना कोणाचे सहकार्य मिळाले नाही. शेवटी या पाचही विद्यार्थ्यांनी धुळ्यातील एकवीरा पोलीस ठाण्यात जावून आपली कैफियत मांडली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जात असतांना पाच जणांना पोलीस दंडुक्याचा प्रसाद मिळाला. बाहेरील एकंदरीत वातावरण पाहून निराश झालेल्या विद्यार्थ्यांनी खोली गाठली. सायकलवरच गावी परतण्याचा निर्णय घेतला.

पहाटेच प्रवास सुरू

गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी धुळ्याहुन अक्कलकुव्याच्या दिशेने आपला सायकल प्रवास सुरु केला. धुळे ते नंदुरबार हे ९५ किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी त्यांना आठ तास लागले. दुपारी एकच्या सुमारास हे सायकलस्वार सामाजिक कार्यकर्ते राहुल कुंड्टाार यांना दिसले. त्यांनी विद्याथ्यांना चहापान करून धीर दिला. नंतर यातील तीन विद्यार्थी अक्कलकुव्याच्या दिशेने सायकलने मार्गस्थ झाले. तर दोन विद्यार्थी नंदुरबारमधील आपल्या नातेवाईकांकडेच थांबले. दिलीप आणि विकाससह त्यांच्या अन्य एका मित्राचा अक्कलकुव्याच्या दिशेने सुरु झालेला एकूण १३१ किलोमीटरचा प्रवास १२ तासांनी संपला.

दिलीप आणि विकास यासारखे अनेक विद्यार्थी आजही विविध शहरांत संचारबंदीत अडकले आहेत.  नाशिकसह काही शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन संचारबंदीत अडकलेल्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. अनेक शहरात बरेच जण अशा मदतीपासून दूर आहेत. यामुळेच माणुसकीच्या जाणीवेतून असे विद्यार्थी, मजूर वा वाहनधारकांना मदतीची गरज व्यक्त होत आहे.

नाशिकमध्ये मजूर अडकले

आदिवासीबहुल भागातून मार्चमध्ये रोजगारासाठी मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होते. कामासाठी गेलेले मजूर संचारबंदीत अडकून पडल्याने त्यांच्या कुटुंबियांचे भोजनाचे हाल होत आहेत. बहुतांश घरात दोन-चार दिवस पुरेल इतकेच अन्नधान्य आहे. संचारबंदीमुळे हाताला काम नाही आणि खिशात पैसे नाही, अशी आदिवासी पाडय़ांवर स्थिती आहे. होळी झाल्यानंतर बहुतांश आदिवासी बांधव रोजगाराच्या शोधात बाहेर पडले. दिंडोरी, पिंपळगाव आणि आसपासच्या परिसरात ही मंडळी शेतात मजूर म्हणून कामासाठी गेली. वाहतूक बंद झाली. आणि ते सर्व वेगवेगळ्या ठिकाणी अडकले. नाशिक जिल्ह्याक अशा मजुरांची संख्या एक हजारच्या आसपास असल्याचा अंदाज यासंबंधी सर्वेक्षण करणाऱ्या श्रमजीवी संघटनेने व्यक्त केला. संघटनेचे पदाधिकारी भगवान मधे यांनी ही माहिती दिली. आज मजुरांचा रोजगार बंद झाला. गावातील कुटुंबियांकडील अन्नधान्य संपले आहे. कुटुंबातील सदस्यांकडे पैसे नाहीत. अशा विचित्र स्थितीत आदिवासी बांधव अडकल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविणे आणि कुटुंबियांना मोफत रेशन उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने केली आहे.