अनिकेत साठे

जलदाबाचा परिणाम, भूगर्भातील हालचालींच्या माहितीअभावी सुरक्षा वाऱ्यावर

जलसाठा, भूगर्भातील हालचाली आदींचा धरणाच्या रचनेवर होणाऱ्या परिणामांचा वेध घेण्यासाठी राज्यातील प्रमुख ७७ धरणांमध्ये बसविलेली निम्म्याहून अधिक उपकरणे निकामी झाली आहेत. या धरणांमधील चार हजार ३२८ पैकी केवळ एक हजार ९३४ उपकरणे सुरू असून, उर्वरित दोन हजार ३९४ बंद आहेत.  धरणांचे विविध प्रकारचे बदल टिपणारी उपकरणेच नादुरुस्त झाल्याने धरणांवरील संभाव्य परिणामांचे आकलन करणे अवघड झाले आहे.

चिपळूणमध्ये तिवरे धरण फुटून मनुष्यहानी झाली होती. त्यादृष्टीने धरण सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चिला जाऊ लागला आहे. यानिमित्ताने राज्यातील धरणांच्या सुरक्षिततेची पाहणी करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला होता. या पाश्र्वभूमीवर धरण सुरक्षितता संघटनेच्या अहवालातून हे वास्तव उघड झाले आहे. या उपकरणांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे धरणांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. नादुरुस्त उपकरणांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे संघटनेने सूचित केले आहे. नादुरुस्त उपकरणांची संख्या दरवर्षी वाढत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील गंगापूरसह गिरणा, चणकापूर, भंडारदरा तर पुणे विभागातील पानशेत, पवना, येडगाव, उजनी, दूधगंगा, वारणा धरणातील बहुतांश उपकरणे बंद आहेत. हीच परिस्थिती कोकण विभागातील अप्पर वैतरणा, सूर्या धरणासह नागपूर येथील शिरपूर, कामठी खैरी, बोर आदी प्रकल्पांच्या बाबतीत आहे.

अमरावती विभागात नालगंगा, ग्यानगंगा, अप्पर वर्धा, काटेपूर्णा तसेच मराठवाडय़ातील जायकवाडी, माजलगाव, लोअर तेरणा आदी धरणांमध्ये अचूक मापन करणे कठीण झाले आहे. धरणाच्या दोन्ही बाजूंकडील उतारावर होणाऱ्या बदलाची नोंद घेणारे ‘स्लोप इंडिकेटर’ आणि ‘स्ट्रेस मीटर’ तुलनेने चांगल्या प्रकारे कार्यरत आहे.

उपकरणांची विभागनिहाय स्थिती

* उत्तर महाराष्ट्रातील १० धरणांमधील ९७ टक्के उपकरणे बंद असून केवळ ३ टक्के उपकरणे सुरू

* कोकण विभागातील १४ धरणांतील ७७ टक्के उपकरणे सुरू असून २३ टक्के उपकरणे बंद

* पुणे विभागातील २७ धरणांतील ६२ टक्के, मराठवाडय़ातील सात धरणांतील ७५ टक्के उपकरणे नादुरुस्त

* अमरावतीच्या १० धरणांतील ९२ टक्के आणि नागपूर विभागातील ९ धरणांतील ७८ टक्के उपकरणे नादुरुस्त

नेमकी समस्या काय?

पावसाळ्यात जलसंचयाने धरणाच्या रचनेत काही बदल होतात. जलसाठय़ाचा दाब धरणाचे बांधकाम, भिंतींसह जमिनीवरही पडतो. भूकंप, भूगर्भातील अन्य घडामोडीप्रसंगी निर्माण होणाऱ्या कंपनांचा परिणामही होतो. वेगवेगळ्या परिस्थितीला धरण कसे सामोरे जाते, हे जाणून घेण्यासाठी रचनेवर पडणारा दाब मापन करणारे दाब मापक (पिझो मीटर), बांधकामावरील ताण मोजणारे ‘स्ट्रेस मीटर’, उताराकडील भागावर लक्ष देण्याकरिता ‘स्लोप इंडिकेटर’, जमिनीवरील दाब मोजणारे ‘अर्थ प्रेशर सेल’, ‘पोअर प्रेशर मीटर’ इत्यादी उपकरणांच्या साहाय्याने धरणाच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवले जाते. बंद पडलेल्या उपकरणांच्या यादीत दाब मापकांची संख्या अधिक आहे. जवळपास ७४ टक्के उपकरणे बंद आहेत. अनेक वर्षांपासून त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या व्यतिरिक्त ‘पोअर प्रेशर मीटर’, ‘अपलिफ्ट प्रेशर सेल’, ‘जॉइंट मीटर’ ही उपकरणेही काही प्रमाणात बंद आहेत.

उपकरणांद्वारे धरणांचे आरोग्य, त्यांची कार्यक्षमता समजण्यास मदत होते. धरणाची जबाबदारी असलेले लोक उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करतात. उपकरणांद्वारे मिळणाऱ्या माहितीतून धरणाच्या आरोग्याचा अभ्यास करता येतो. कोयना धरणात या उपकरणांच्या देखभालीकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते. इतरत्र मात्र गांभीर्याने पाहिले जात नाही.

– दिनकर मोरे (माजी महासंचालक, महा. अभियांत्रिकी संशोधन संस्था)