दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्य़ांमध्ये पोलिसांना हव्या असलेल्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या तीन साथीदारांना दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखा आणि कळवण पोलिसांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांनी कारवाईत तीन लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमालही जप्त केला.

निफाड परिसरातील सराईत गुन्हेगार श्रावण ऊर्फ सावन्या पिंपळे याला ग्रामीण पोलिसांनी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातून सुनावणीसाठी निफाड न्यायालयात एप्रिलमध्ये हजर केले होते. सुनावणी झाल्यानंतर कारागृहात परत नेत असताना पोलिसांच्या हातावर तुरी देत सावन्या पळाला होता. याबाबत निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस त्याचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेकडूनही तपास सुरू होता. बुधवारी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी फरार आरोपींच्या शोधात कळवण आणि निफाड परिसरात गस्त घालत असताना सावन्या त्याच्या साथीदारांसह लाल रंगाच्या चारचाकी वाहनातून कळवण तालुक्यात फिरत असल्याची माहिती मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यानुसार कळवण पोलिसांच्या सहकार्याने कळवण ते नांदुरी रस्त्यावर लाल रंगाच्या स्विफ्ट कारचा शोध सुरू केला. चिखलीपाडा फाटा परिसरात चार ते पाच संशयित लाल रंगाच्या वाहनासह रस्त्याच्या बाजूला उभे असल्याचे दिसले.

पोलिसांनी चहुबाजूने घेराव घालत दोन संशयितांना जागेवरच पकडले. तर कारमधून उडी मारून पळालेल्या तीनपैकी दोन संशयितांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. एक संशयित पळून गेला.

पोलिसांनी संशयित सावन्या, सोहेल ऊर्फ सोहेब अन्सार मनियार (२०, रा. सातपूर), गणेश पिंपळे (२१, रा. औरंगाबाद), किरण आहिरे (२७, रा. अहदनगर) यांना ताब्यात घेतले. संशयितांनी सावन्याच्या सांगण्यानुसार कळवण-नांदुरी रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून लाल रंगाची स्विफ्ट कार, एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस, चॉपर, गज, कटावणी, स्क्रू-ड्रायव्हर, लोखंडी पाना असे साहित्य तसेच दोन भ्रमणध्वनी, रोख १४,७०० रुपये असा तीन लाख ३५,२०२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गणेश तेलोरे हा फरार आहे. मुद्देमालासह संशयितांना कळवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.