इगतपुरी : मध्य रेल्वेच्या तपोवन एक्स्प्रेस आणि इतर गाडय़ांमध्ये शिरून प्रवाशांच्या हाताला झटका देत इगतपुरीदरम्यान भ्रमणध्वनी चोरी करणाऱ्या टोळीला इगतपुरी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांचे १६ भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले आहेत.

रेल्वेने प्रवास करणारे अनेक प्रवासी इगतपुरी, कसारा घाटातील निसर्गरम्य देखावे भ्रमणध्वनी कॅमेऱ्यात टिपण्यासाठी गाडीचा दरवाजा तसेच खिडकीतून हातात भ्रमणध्वनी धरून चित्रीकरण करतात. अशा प्रवाशांच्या हातावर काठीने किंवा धारदार शस्त्राने फटका मारून भ्रमणध्वनी चोरी करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. आजपर्यंत हजारो प्रवाशांचे भ्रमणध्वनी चोरीस गेले आहेत. बऱ्याच प्रवाशांचा प्रवास लांब पल्ल्याचा असल्याने तसेच गाडी जास्त वेळ थांबत नसल्याने तक्रार देत नसल्याने या टोळ्यांचे चांगलेच फावले होते.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार पवार (रा. दिंडोरीरोड, नाशिक) हे तपोवन एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून नांदेड ते मुंबई असा प्रवास करीत असताना इगतपुरी येण्याआधी बोरटेंभे पुलाजवळ रेल्वेचा वेग कमी झाला.

त्यावेळी चोरटय़ांनी पवार यांच्या हाताला झटका दिला. त्यांचा भ्रमणध्वनी खाली पडताच तो घेऊन चोरटे पसार झाले. याबाबत पवार यांनी इगतपुरी रेल्वे पोलिसांत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वे पोलीस आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने तपास मोहीम राबविली.

त्यात राहुल साळवे (रा. मिलिंदनगर इगतपुरी, सध्या रा. घोटी), ललित मोरे (रा. मिलिंद नगर, इगतपुरी) आणि विशाल आतकरी (२३, रा. बोरटेंभे, इगतपुरी) या चोरटय़ांना रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्यांना कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्य़ातील विविध कंपन्यांचे १६ भ्रमणध्वनी आणि धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आले. संशयितांपैकी राहुल साळवे (२०) याच्यावर घोटी पोलीस ठाणे, इगतपुरी पोलीस ठाणे आणि इगतपुरी रेल्वे पोलिसांत अनेक गुन्हे दाखल आहेत.

प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करताना दाराजवळ उभे राहून किंवा खिडकीतून हातात भ्रमणध्वनी घेऊन छायाचित्र अथवा चित्रीकरण करू नये. त्याचा फायदा चोरटे घेतात.

-सुधीर पाटील (सहायक पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे)