पर्यटकांची गर्दी, सुट्टीच्या दिवशी संख्येत वाढ

नांदगाव

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

सुमारे ११ वर्षांनंतर तालुक्यातील गिरणा धरण तुडुंब भरल्याने अथांग जलाशय नजरेत साठविण्यासाठी आणि यानिमित्ताने धरणातील माशांचा आस्वाद घेण्यासाठी सध्या धरण परिसरात पर्यटकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे परिसरातील लहान हॉटेल व्यावसायिकांना तसेच मासे विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

सध्या गिरणा धरणात ९५ टक्के जलसाठा झाला आहे. गिरणा धरण हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असून या धरणातील पाण्याचा उपयोग नाशिक जिल्ह्य़ातील नांदगाव, मालेगाव या तालुक्यांसह निम्म्या जळगाव जिल्ह्य़ासाठी होतो. तुडुंब भरलेले गिरणा धरण पाहण्यासाठी सहकुटुंब पर्यटक भेट देत आहेत. त्यातही सुट्टीच्या दिवशी पर्यटकांच्या संख्येत अधिक वाढ होत आहे. गिरणा धरणातील मासेही प्रसिद्ध असल्याने मनसोक्त मासे खाण्याचा आनंद लुटायचा असेल तर एकदा गिरणा धरणावर गेलेच पाहिजे, या ठाम समजुतीने मासे खाण्यासाठी दूरदूरून पर्यटक धरण परिसरात येत आहेत.

रविवारी सुटीच्या दिवशी कुटुंबीयासह बाहेर फिरावयास जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशा मंडळींनी या रविवारी फिरण्यासाठी गिरणा धरणाचा पर्याय निवडला. पुरेशा पावसाअभावी गिरणा धरण पूर्णपणे भरण्याचे प्रसंग फारसे येत नाहीत. यंदा समाधानकारक पावसामुळे ११ वर्षांनंतर धरण पूर्ण भरण्याचा योग आल्याने अथांग जलसंचय असलेले गिरणा धरण कसे दिसते, याचे साक्षी होण्यासाठी जळगाव, धुळे, मालेगाव, नांदगाव आदी भागांतून पर्यटक रविवारी कुटुंबीयांसमवेत दाखल झाले होते. त्यातच धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याच्या चर्चेने पाणी सोडतानाचा प्रसंग पाहण्यासाठीही परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती.

गिरणा धरणावरील माशांची विशेष ख्याती असल्याने पर्यटकांनी कोंबडा, राऊ, आफ्रिका, पंकज, पापलेट, गुलवा, वाम आदी माशांवर यथेच्छ ताव मारला. काही मद्यपान शौकिनांनी आडोशाला जाऊन आपली हौस पूर्ण केली. पर्यटकांमध्ये खवय्यांची संख्या अधिक असल्याने गिरणा धरणावर हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांची यानिमित्ताने चांदी झाली. छोटय़ा स्वरूपात थाटलेले मासे दुकाने गर्दीने भरले. विक्रीबरोबरच चवदार मासे बनवून देणारे हातही कामाला लागले होते. घरगुती स्वरूपातील हॉटेलांमधून गर्दी ऊतू जाऊ लागल्याने पर्यटकांनी जिथे जागा मिळेल तिथे भोजनाचा आनंद घेतला. मालेगाव, जळगाव भागातील पर्यटकांची संख्या अधिक असल्याने अहिराणी आणि खान्देशी भाषेतील संवाद मोठय़ा प्रमाणावर ऐकायला मिळत होती. ‘भाऊ , काय किलो दिधात मासा?..दोनशे रुपयाना किलो शेत दादा..कितला टाईम लागी बनावाले..गर्दी शे दादा आज, एखादा तास लागी.. टाईम लागना तरी चाली, पण मासा चांगला बनाई द्या..तुम्ही मना हातना बनायल मासा खाई तर दखा, नही आवडणात तर पैसा देऊ  नका’ असे पर्यटक आणि घरगुती हॉटेल व्यावसायिक यांच्यातील संवाद रंगत आहेत.

गिरणा धरणावर उपजीविका भागवण्यासाठी छोटासा हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून घर खर्च भागवला जातो. तीन ते चार वर्षांपासून गिरणा धरणात पाणीसाठा कमी असल्याने धरणाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली होती. या वर्षी धरण चांगले भरल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. यामुळे आमच्या हॉटेल व्यवसायालाही सुगीचे दिवस आले आहेत.

-लक्ष्मण कोळी (हॉटेल व्यावसायिक)

अकरा वर्षांनंतर गिरणा धरण ९५ टक्क्य़ांपेक्षा अधिक भरल्याने ते पाहण्यासाठी आम्ही येथे आलो. आम्हांला मासे खाण्याचा मोहदेखील आवरता आला नाही. पर्यटन आणि मासे खाण्याचा आनंद या दोन्ही गोष्टींमुळे सुटीचा दिवस सत्कारणी लागला. कुटुंबातील सर्वच जण त्यामुळे खूश झाले.

-नानाजी ठाकरे (पर्यटक, महालपाटणे, देवळा)