अर्थचक्र रूळावर आणण्यासाठी महामंडळाचा निर्णय

नाशिक : करोनाचा वाढता संसर्ग आणि केंद्र तसेच राज्य सरकारने लागु केलेली टाळेबंदी पाचव्या पर्वात शिथील झाल्यानंतर प्रवाशांअभावी तोटय़ात चाललेले अर्थचक्र रूळावर आणण्यासाठी राज्य परिवहनने मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत नाशिक आगारातून २६ ठिकाणी मालवाहतूक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सध्या बस गाडय़ांमधून टप्पा वाहतूक पध्दतीने प्रवासी वाहतूक सुरू आहे. नाशिक विभागातून शेतकरी, व्यापारी, कारखानदारांना बसगाडय़ांमधून माल वाहतूक करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पुरेशा माहितीअभावी या सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. नाशिक विभागाकडून स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.

कक्षातून जिल्हा परिसरातील शेतीमाल उत्पादक,  व्यापारी, शेतकरी, सिन्नर, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांशी सातत्याने संपर्क साधण्यात येत आहे. परिणामी, आतापर्यंत २६ ठिकाणी नाशिक आगारातून मालवाहतुक सेवा पोहोचली आहे. यामध्ये पुणे, मुंबई, अहमदनगर, वाशी, अंबरनाथसह अन्य ठिकाणी मालवाहतूक करण्यात आली. जिल्ह्य़ाबाहेर सेवा देतांना जिल्हाअंतर्गतही व्यापारी, उद्योजकांना ही सेवा देण्यात आल्यामुळे नाशिकमधून नांदगाव, कादवा या ठिकाणी मालवाहतुक सुरू आहे. या माध्यमातून खत, साखर, सिमेंट, कांदा, भगर, मैदा आदी मालाची वाहतूक करण्यात आली आहे.

सध्या १० वाहनांतून मालवाहतूक होत आहे. लवकरच ही संख्या २० पर्यंत पोहचेल, अशी माहिती वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली. नाशिक विभागातून शेतकरी, व्यापारी, कारखानदार यांनी अधिक माहितीसाठी विभागीय भांडार अधिकारी यांच्याशी ९४८९७०५५४५, ०२५३- २३०९३०५, २३०३९०२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन  नाशिक विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी केले आहे.