जिल्हा व सत्र न्यायाधिश (३) तथा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष व्यंकटेश अरविंदराव दौलताबादकर (४७) यांचे सोमवारी सकाळी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
दौलताबादकर हे २०१३ मध्ये मुंबईहून नाशिकच्या न्यायालयात रुजू झाले होते. नाशिक न्यायालय ही त्यांची दुसरी नेमणूक. मूळचे परभणीचे असणारे दौलताबादकर २०१० मध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊन न्यायाधिश झाले. मुंबई येथे तीन वर्ष सेवा केल्यानंतर नाशिक येथे जिल्हा व सत्र न्यायाधिश (३) म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थान अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. सिंहस्थाच्या तोंडावर आलेली ही जबाबदारी दौलताबादकर यांनी अतिशय उत्कृष्टरित्या पेलली. देवस्थान कार्यालयात सुरू असलेल्या अनेक अनिष्ट बाबींना पायबंद घालत भाविकांसाठी देणगी दर्शन ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. सिंहस्थात अधिकाधिक भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून देवस्थान आवारात खास व्यवस्था करण्यात आली. सोमवारी सकाळी विश्रामगृहालगतच्या हिमालय या शासकीय निवासस्थानी दौलताबादकर यांना हृदय विकाराचा धक्का बसला. या घटनेची माहिती समजल्यानंतर न्यायालयातील इतर न्यायाधिश आणि वकिलांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन श्रध्दांजली अर्पण केली.