नाशिकमध्ये लॉकडाउनची कडक अमलबजावणी केली जाणार असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लॉकडानच्या नियमांचं कडक पालन केलं जाईल असं ते म्हणाले आहेत. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं की, “नाशिकमध्ये सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लॉकडाउनची कठोर अमलबजावणी केली जाणार आहे. या वेळेत जिल्ह्यात कर्फ्यूसदृश्य परिस्थिती असेल”. या बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश जगदाळे उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकार एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.