पारा ११.६ अंशापर्यंत

ओखी चक्रीवादळामुळे आठ दिवसांपूर्वी अवकाळी पावसाच्या सरी झेलणारे नाशिक बुधवारी सकाळी दाट धुक्यांच्या दुलईत लपेटले गेले. त्या जोडीला तापमानाचा पारादेखील ११.६ अंशापर्यंत खाली उतरल्याने पुन्हा एकदा हुडहुडी भरविणाऱ्या थंडीची प्रचीती आली. दाट धुक्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून लांब पल्ल्याच्या गाडय़ा अनेक तास विलंबाने धावत आहेत. याच कारणास्तव मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस तीन दिवस रद्द करण्यात आली.

दिवाळीनंतर नाशिकमध्ये थंडीचे आगमन झाले होते. नोव्हेंबर महिन्यात १०.४ अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. पुढील काळात तापमान आणखी खाली जाईल, असे वाटत असताना ओखी चक्रीवादळाने हवामानात कमालीचे बदल घडले. दोन-तीन दिवस ढगाळ हवामान राहिले. याच काळात अवकाळी पाऊसही झाला. या घटनाक्रमाने तापमानात पाच ते सहा अंशांनी वाढ झाली. ढगाळ वातावरणामुळे उंचावलेले तापमान आकाश जसे निरभ्र झाले, तसे पुन्हा एकदा खाली आले आहे. मागील आठ दिवसांत तापमान सहा अंशाने कमी झाले.

डिसेंबरच्या मध्यावर पुन्हा एकदा हुडहुडी भरविणाऱ्या गुलाबी थंडीची अनुभूती मिळत आहे. रात्रीपासून वातावरणात कमालीचा गारवा जाणवत होता. पहाटे त्यात धुक्याची भर पडली. शहर परिसरातील रस्ते, इमारती धुक्यामुळे दिसेनासे झाले. वाहनधारकांना दिवे सुरू ठेवून मार्गक्रमण करावे लागले. अनेकांनी सकाळी लवकर जागे होऊन धुक्याच्या दुलईचा नजारा पाहिला. काहींनी गोदा पार्क, तत्सम ठिकाणी धाव घेऊन गोदावरीवर पसरलेल्या धुक्याचे छायाचित्रण करण्याचा आनंद लुटला. सूर्योदयानंतर हळूहळू धुक्याची चादर कमी होत गेली.

हिवाळ्याच्या हंगामात नाशिकचा पारा किमान एकदा तरी पाच ते सहा अंशापर्यंत खाली जातो. गत काही वर्षांतील नीचांकी पातळीचा आढावा घेतल्यास ही नोंद प्रामुख्याने जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात झालेली दिसते.

यावर्षी तो अद्याप दहा अंशाच्याही खाली आलेला नाही. दिवाळीनंतर लगेच थंडीचे आगमन झाले. यामुळे यंदा अधिक काळ गारव्याची अनुभूती मिळून तापमान नीचांकी पातळी गाठेल, असा सर्वाचा अंदाज होता. परंतु अद्यापपर्यंत तसे घडले नाही. सर्वसाधारणपणे उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव नाशिकच्या तापमानावर होतो आणि त्यामुळे थंडीची लाट येते, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

सध्या त्या भागात तापमान कमालीचे घसरले आहे. त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे नाशिकचे तापमान आणखी कमी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यंदाच्या हंगामात सर्वसामान्यांना अधिक काळ गारव्याचा आनंद मिळणार आहे.

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई-परिसरातील दाट धुक्यामुळे मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत तीन दिवस रद्द करण्यात आल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. सध्या सर्वत्र दाट धुक्यामुळे प्रामुख्याने रात्री आणि पहाटे धावणाऱ्या अनेक गाडय़ांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. उत्तर भारतातून भुसावळ, मनमाडमार्गे दौंड, पुणे, कर्नाटक, गोवा यासह मुंबईला जाणाऱ्या अनेक गाडय़ा तीन ते आठ तासांच्या विलंबाने धावत असल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे वेळापत्रक कोलडले आहे. निजामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेस, जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेस, अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस, नवी दिल्ली-बंगळूरु कर्नाटक एक्स्प्रेस या गाडय़ा दाट धुक्यामुळे रोज विलंबाने धावत आहे. गत सप्ताहात अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस ही गाडी सलग दोन दिवस रद्द करण्यात आली होती. याच पाश्र्वभूमीवर, दाट धुके पडत असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ांनाही विलंब होत आहे. दाट धुक्यामुळे मनमाड मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस १४ डिसेंबपर्यंत रद्द करण्यात आली. थंडी आणि दाट धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक आगामी काही दिवसांत विस्कळीत राहण्याची चिन्हे दिसू लागली आहे.