राज्यात एका स्थानाची सुधारणा, टक्केवारीत मुलींची बाजी

नाशिक : १२ वी परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत नाशिक विभागीय मंडळाच्या निकालात काहीशी सुधारणा होऊन तो ८८.८७ टक्क्यांवर गेला असला तरी राज्याच्या क्रमवारीत मंडळ आठव्या स्थानी फेकले गेले. उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. विज्ञान शाखा सर्वाधिक म्हणजे ९६.८२, वाणिज्य ९२.९७, व्यावसायिक ८०.५२ तर कला शाखेची सर्वात कमी ७९.३३ अशी टक्केवारी राहिली. गेल्या वर्षी नाशिक विभागाचा ८४.७७ टक्के निकाल होता.

विभागाच्या निकालावर नजर टाकल्यास मुलींचे निर्विवाद वर्चस्व दिसून येते. यंदा विभागात एक लाख, ५६ हजार, ७८९ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी एक लाख, ३९ हजार, ३४६ उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ९२.५४ टक्के मुली तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.२६ इतकी आहे. मुला—मुलींच्या उत्तीर्णतेच्या प्रमाणात जवळपास सहा टक्क्य़ांचा फरक आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात काहीअंशी वाढ झाली. परंतु, राज्यातील निकालात नाशिक पिछाडीवर राहिले. गुरूवारी दुपारी एक वाजता निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. विद्यार्थी आणि पालकांनी सकाळपासून भ्रमणध्वनी, संगणकासमोर ठाण मांडले होते. ऑनलाइन निकाल जाहीर झाला असला तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप महाविद्यालयांमार्फत करण्यात येईल. त्याची तारीख मंडळाने अद्याप जाहीर केलेली नाही. ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुण पडताळणी, छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली

संकेतस्थळावरील प्रत काढून अर्ज भरता येणार असून गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह १७ ते २७ जुलै या कालावधीत विहित शुल्क भरून अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी १७ जुलै ते पाच ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. श्रेणी, गुणसुधार योजना फेब्रुवारी-मार्च २०२० च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन परीक्षांमध्ये संधी उपलब्ध राहतील, असे विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी म्हटले आहे.

प्रथम श्रेणीत सर्वाधिक उत्तीर्ण

यंदाच्या निकालात नाशिक विभागात विशेष प्रावीण्यासह १२ हजार ४६५ विद्यार्थी, तर ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण ६२ हजार ६५० विद्यार्थ्यांनी मिळविले. ४५ टक्क्य़ांपुढे अर्थात द्वितीय श्रेणीत ६० हजार, ६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण श्रेणीत म्हणजे ३५ टक्क्य़ांपुढे गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३६०९ आहे.

उत्तीर्णतेत धुळ्याची आघाडी

नियमित परीक्षार्थीच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीत धुळे जिल्हा आघाडीवर आहे. या जिल्ह्य़ाची टक्केवारी ९१.११ टक्के एवढी आहे. यादीत जळगाव (८९.७२ टक्के), नाशिक (८९.४६) तर आदिवासीबहुल नंदुरबार (८०.३२) आहे. नाशिक जिल्ह्य़ात ६२ हजार ७३४ धुळे जिल्ह्य़ात २१ हजार ८४२, जळगावमध्ये ४२ हजार १३७ आणि नंदुरबारमध्ये १२ हजार ६३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

गैरमार्ग प्रकरणी १२२ विद्यार्थ्यांना शिक्षा

१२ वी परीक्षेत गैरमार्ग प्रकरणी १२२ विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यात आली असून त्यामध्ये नाशिकचे ४५, धुळे आठ, जळगाव ४३ तर नंदुरबारच्या २६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गैरमार्ग प्रकरणी एकूण १४८ प्रकरणे प्राप्त झाली होती. त्यातील १२२ जणांना शिक्षा झाली. समुपदेशनाच्या माध्यमातून शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियान राबविले. त्याचा सकारात्मक परिणाम परीक्षेत दिसून आला. गेल्या वर्षी गैरमार्गाची १५४ प्रकरणे होती. त्यात यंदा घट झाली आहे.