गोदावरी, पंचवटी एक्सप्रेस, राज्यराणी, मनमाड-इगतपुरी शटल गाडय़ा तीन महिन्यांपासून बंद

मनमाड : तीन महिन्यांपासून मनमाड शहराची नाशिकशी असलेली नाळ तुटली आहे. रेल्वे तसेच बस वाहतूक बंद असल्याने अनेक चाकरमान्यांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. तर काहींना आपल्या कंपन्यांमधील चांगली नोकरी गमवावी लागली आहे. यात महिलांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. दुसरीकडे उच्च शिक्षणासाठी नाशिकला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.

मनमाडची जीवन वाहिनी समजली जाणारी रेल्वेची गोदावरी एक्स्प्रेस आणि त्याचबरोबर पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी आणि मनमाड-इगतपुरी शटल या महत्वाच्या गाडय़ा तीन महिन्यांपासून बंद असल्याने चाकरमाने, व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थ्यांचे अतोनात हाल सुरू आहेत.

मनमाडहून दररोज लासलगांव, निफाड, नाशिक, कल्याण आणि मुंबई येथे ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या नोकऱ्या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी, शटल बंद असल्याने धोक्यात आल्या आहेत. र्निबध शिथील झाल्यानंतर इच्छितस्थळी कामावर दररोज पोहचण्यासाठी चाकरमान्यांचा खिसा खाली होत आहे.

तसेच मानसिक आणि शारीरिक त्रासही प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मनमाडकरांची जीवन वाहिनी अर्थात प्रवास वाहिनी असलेली प्रमुख रेल्वेगाडी म्हणजे मनमाड -कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस ही एक जुलैपासून शासकीय, निमशासकीय आणि खासगी प्रतिष्ठांनामध्ये नोकरीस असणाऱ्या चाकरमानी आणि उद्योजक व्यावसायिकांसाठी तरी रेल्वेने सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नाशिक, मुंबई-पुण्यासह विविध भागात करोना आजाराचा संसर्ग वाढत असला तरी शासकीय आणि खासगी कार्यालयात टप्प्याटप्प्याने आवर्तन पध्दतीने काम सुरू झाले आहे. कर्मचाऱ्यांची उपस्थिती नसेल तर वेतनही कापले जात आहे.

रेल्वेअभावी दोन हजार जण घरी

नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, लासलगांव परिसरांतून नाशिकला तसेच मुंबईला नोकरी आणि विविध व्यवसाय उद्योगांसाठी सुमारे दोन हजार नागरिक ये-जा करतात. पण ते सर्व सध्या घरी आहेत. खासगी वाहतूक लपून छपून सुरू असली तरी त्यांचे दर परवडणारे नाहीत. आणि दुचाकीवर एवढय़ा लांबचा प्रवास, दररोज जाऊन येऊन शक्य नाही. इंधन दरवाढीमुळे तो आर्थिकदृष्टय़ा परवडणाराही नाही.