नाशिक : भूखंड खरेदीच्या नावाखाली गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवत फिनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल कंपनीने दोन जणांची चार लाख ८४ हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या पाच जणांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंदनगर येथील चंद्रकिरण पार्क येथे फिनिक्स कंपनीचे कार्यालय थाटून सिन्नरच्या देवपूर परिसरात भूखंड असल्याची बतावणी करून संशयितांनी दोन गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संशयितांच्या भूलथापांना बळी पडून शिवाजी पाटील (५९, सिद्धेश्वरनगर) आणि मीनाक्षी पाटील यांनी जानेवारी २०१० ते ऑगष्ट २०११ या कालावधीत देवपूर शिवारातील गट क्रमांक ११७०१२, ११७०१३-१२२६ या क्षेत्रावरील ६३१ आणि ६३२ या १५० चौरस मीटरच्या भूखंडासाठी चार लाख ८३ हजार ४३० रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याबाबत संशयितांनी विक्री करारनामाही करून दिला. ठरल्याप्रमाणे शिवाजी पाटील आणि मीनाक्षी पाटील यांनी पूर्ण रक्कम भरली. परंतु, संशयितांनी अद्याप भूखंडाचा ताबा अथवा खरेदीखत करून दिले नाही. गुंतवणूकदारांनी संबंधितांशी संपर्क साधला असता टाळाटाळ केल्याने अखेर पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली. कंपनीचे जितेश नशीने, अहमद ए जिवानी, विजय गौतम (तिघे नागपूर), मोतीलाल भांडेबुचे (विनोबानगर, भंडारा) आणि सचिन नाफडे (नाशिक) अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.