व्ही. शांताराम फाऊंडेशनच्यावतीने निर्मिलेल्या ‘शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा’सूचीचे प्रकाशन शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी फाऊंडेशनचे किरण शांताराम उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखेचे कार्याध्यक्ष विरेंद्र चित्राव, श्रीकांत बच्छाव उपस्थित राहतील.

गंगापूर रस्त्यावरील कुसुनाग्रज स्मारकात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कुसुमाग्रज फिल्म सोसायटीचे हेमंत बेळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्व भारतीय प्रादेशिक चित्रपटांचा जनक असलेल्या मराठी चित्रपटाची गेल्या १०० वर्षांतील संपूर्ण सूची व्ही. शांताराम फाऊंडेशनने तयार केली आहे. या सूचीत १९१३ ते १९३१ पर्यंत मराठी दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या ३७२ मूकपटांची सूची आहे. तसेच १९३२ या पहिल्या ‘अयोध्येचा राजा’ या मराठी चित्रपटापासून ते २०१३ च्या डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटापर्यंतच्या २०० मराठी चित्रपटांची सूची आहे. त्यात कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपटातील गाण्यांची एक ओळ, सेन्सॉर प्रमाणपत्र क्रमांक अशी विशेष माहिती देण्यात आली आहे. प्रकाशन सोहळ्यानंतर डॉ. व्ही. शांताराम यांच्या आत्मचरित्राचे वाचन दिलीप प्रभावळकर करणार आहेत. तसेच ‘शांतारामा’ या नावाने तयार करण्यात आलेल्या ऑडिओ सीडीचे प्रकाशन, शांताराम बापूंच्या चित्रपटातील लोकप्रिय गीतांची ध्वनीमुद्रिका ‘अमर मराठी चित्रफित’चे प्रकाशन हस्ते होणार आहे. यावेळी ‘पोट्रेट ऑफ पायोनिअर- व्ही. शांताराम’ ही मधुरा जसराज यांनी दिग्दर्शित केलेला माहितीपट दाखविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.