साधारणत: दीड महिन्यांपूर्वी सर्व काही सुरळीत झाले होते. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३०० दिवसांवर गेला होता. करोना आहे की नाही, हा प्रश्न पडावा, अशी स्थिती होती. महिनाभरातच सर्व चित्र बदलले. करोनाचा इतक्या वेगाने प्रसार झाला, की नाशिक विभागात रुग्ण दुप्पटीचा कालावधी सरासरी ४६ दिवसांवर येऊन ठेपला आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह््यांत १८ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत करोनाचे जवळपास अडीच लाख नवीन रुग्ण सापडले. वाढत्या रुग्णांमुळे औषधांपासून ते खाटांपर्यंत रुग्णांसह नातेवाईकांची फरफट होत आहे.

विभागात करोनाचा आलेख झपाट्याने उंचावत आहे. नव्याने आढळणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा पार केला. या प्रसारामागील कारण शोधण्याचे सुरुवातीला प्रयत्न झाले. आजही आरोग्य विभागाची प्रयोगशाळा प्रत्येक आठवड्याला काही नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य प्रयोगशाळेकडे

पाठविते. आतापर्यंत तसे ३६४ नमुने पाठविले गेले. परंतु प्रारंभीचे काही निवडक वगळता उर्वरित नमुन्यांविषयी माहिती स्थानिक यंत्रणेला मिळालेली नाही. ती आरोग्य विभागाच्या वरिष्ठांकडे देण्यात आल्याचे प्रयोगशाळेकडून सांगितले जाते. नव्या प्रकारच्या विषाणूची संसर्गक्षमता लक्षणीय आहे. घरातील एखादी व्यक्ती बाधित झाली, की कुटुंबातील सर्व सदस्य बाधित झाल्याची अनेक उदाहरणे असल्याचे डॉ. उत्कर्ष दुधाडिया यांनी सांगितले. त्यामुळे सकारात्मकतेचे प्रमाण वाढले. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार नाशिकमध्ये २७.९१, नगर २०.६३, जळगाव १०.९३, नंदुरबार २२.२ व धुळ्यात हे प्रमाण १३.०८ टक्के इतका हा दर आहे.

महिनाभरापूर्वी विभागातील बाधितांची एकूण संख्या तीन लाख २६ हजार होती. सध्या ती पावणेसहा लाखहून अधिकवर पोहोचली. महिनाभरात विभागात दोन लाख ४८ हजार ६६९ नवीन रुग्ण आढळले. त्यातील एक लाख ९१ हजार ८१६ करोनामुक्त झाले. या काळात १९७५ जणांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांमध्ये ५० हजारांनी वाढ होऊन संख्या ८२ हजारांचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. यातील जवळपास निम्मे रुग्ण एकट्या नाशिकमध्ये तर साधारणत: २३ टक्के रुग्ण नगर जिल्ह्यातील आहेत.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.३९ टक्के असून मृत्युदर १.२९ टक्के इतका आहे. विभागात सध्या नाशिकमध्ये ३८४६७, जळगाव १११९३, धुळे ३५९५, नंदुरबार ८१९८, नगर जिल्ह्यात १९९०५ सक्रिय रुग्ण आहेत. यातील २९ हजार ८०५ संस्थात्मक तर ३४ हजार ९७६ रुग्ण गृहअलगीकरणात आहेत. बाधितांच्या संपर्कातील दोन लाख २८ हजार ९७७ जण गृहविलगीकरणात, तर १५९९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊन सुविधा अपुऱ्या पडत आहेत.

अतिदक्षता विभागात ३०८९ रुग्ण

विभागात सध्या ३०८९ रुग्ण अतिदक्षता विभागात असून त्यातील ९८१ व्हेंटिलेटर, तर २१०८ प्राणवायूच्या आधारावर आहेत. याशिवाय अतिदक्षता विभागात नसलेल्या ६३४४ रुग्णांना प्राणवायू व्यवस्थेचा आधार देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात अतिदक्षता विभागात ११६० (प्राणवायू व्यवस्थेवर २०७०), जळगाव ८५१ (१५७९), धुळे ४० (६०), नगर ८३२ (२२१८) आणि नंदुुरबारमध्ये २०६ (४११) रुग्णांना प्राणवायूचा आधार द्यावा लागला आहे. सक्रिय रुग्णांपैकी ७१ हजार ९२५ रुग्ण लक्षणविरहित, सौम्य लक्षणे असणारे असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी सांगितले.

जिल्हानिहाय रुग्ण दुपटीचा वेग

दीड महिन्यांपूर्वी विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३०० दिवस होता. दुसऱ्या लाटेत तो बराच कमी होऊन सरासरी ४६ दिवसांवर आला आहे. जिल्हानिहाय विचार करता सध्या नगर जिल्ह्यात ३१.१८ दिवसांत, नंदुरबार ३७.७३, नाशिक ४०.१९, जळगाव ६५.७४ आणि धुळे जिल्ह्यात ६१.७४ दिवसांत रुग्ण दुप्पट होत असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.