विभागात धुळे जिल्हा आघाडीवर
बारावी निकालात राज्यात शेवटच्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या नाशिक विभागीय मंडळाने दहावीच्या निकालात मात्र काहीसा वरचा अर्थात पाचवा क्रमांक मिळवला. नाशिक विभागीय मंडळाचा दहावीचा निकाल ८९.६१ टक्के लागला. जिल्हानिहाय विचार केल्यास उत्तीर्णतेत धुळे आघाडीवर असून नंदुरबार पिछाडीवर आहे. उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलींनी पुन्हा वर्चस्व राखले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकाल सुमारे पावणेतीन टक्क्यांनी घसरला आहे.
मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी सकाळपासून विद्यार्थी व पालक संगणकाकडे डोळे लावून बसले होते. या परीक्षेत एकूण एक लाख ९८ हजार ६०४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, त्यातील एक लाख ७७ हजार, ९७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाचा जिल्हानिहाय विचार केल्यास धुळे (९०.३६ टक्के), जळगाव (८९.७८), नंदुरबार (८८.९१) आणि नाशिक (८९.४२) अशी टक्केवारी आहे. विभागात प्रविष्ठ झालेल्या एकूण मुलांपैकी ९७ हजार २५७ विद्यार्थी अर्थात ८७.९९ टक्के उत्तीर्ण झाले. मुलींचे हेच प्रमाण ८०७२१ असून टक्केवारी ९१.६६ इतकी आहे. विशेष प्रावीण्य व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. विशेष प्रावीण्य प्राप्त ५३ हजार ४३४, प्रथम श्रेणी ७८ हजार २०३, द्वितीय श्रेणी ४१ हजार ३७७, तर पास श्रेणीत ४९६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
ऑनलाइन निकाल जाहीर झाला असला तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १५ जून रोजी दुपारी तीन वाजता आपापल्या शाळांमध्ये मिळणार आहेत. तसेच मंगळवारपासून गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह ७ ते १६ जून या कालावधीत विहित शुल्क भरून अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम छायाप्रत घेणे अनिवार्य असून ही छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसात मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. दहावीच्या परीक्षेत दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षांसाठी एटीकेटीची सुविधा राहणार आहे.
दहावी व बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेसाठी वेळापत्रकही जाहीर झाले आहे. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा ९ ते २७ जुलै या कालावधीत तर बारावीची लेखी परीक्षा ९ ते २९ जुलै या कालावधीत होणार आहे.

कॉपीप्रकरणी १९७ विद्यार्थ्यांना शिक्षा
दहावीच्या निकालात विभागात २४१ गैरमार्ग प्रकरणे निदर्शनास आली. त्यापैकी १९७ विद्यार्थ्यांवर मंडळ शिक्षासूचीनुसार शास्ती करण्यात आली आहे. गैरमार्ग प्रकरणात नाशिक जिल्ह्यात १०९, जळगाव ५३, नंदुरबारच्या १४ ,तर धुळे जिल्ह्यातील २१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विषयवार टक्केवारी
मराठी प्रथम भाषा ९४.४०
मराठी द्वितीय / तृतीय भाषा ९७.८१
उर्दू प्रथम भाषा ९३.७०
हिंदी प्रथम भाषा ९८.०१
हिंदी द्वितीय / तृतीय भाषा ९३.८७
इंग्रजी प्रथम भाषा ९८.३७
इंग्रजी द्वितीय / तृतीय भाषा ९०.४८
गणित ९०.८९
विज्ञान ९६.७७
सामाजिक शास्त्रे – ९७.४८ टक्के