बचाव समितीचा न्यायालयात जाण्याचा इशारा

निफाड सहकारी साखर कारखाना (निसाका) सुरू व्हावा, यासाठी स्थानिक पातळीवर निसाका बचाव कृती समिती स्थापन करत कारखाना सुरू होण्यासाठी कामगार, सभासद आणि स्थानिक प्रयत्न करत असतांना सहकार विभागाने साखर कारखान्याच्या प्रशासकीय समितीस मुदतवाढ दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सहकार विभागाच्या उरफाटय़ा धोरणामुळे कारखाना सुरू करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसल्याचा आरोप समितीने केला असून प्रशासकीय समितीने आतापर्यंत काही केले नसताना पुढील कालावधीत काय करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच या निर्णया विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

निसाका सुरू व्हावा यासाठी कृती समितीच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे. मध्यंतरी या प्रश्नाबाबत ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी आंदोलनाची धुरा स्विकारत कारखाना लवकरच सुरू करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. पाटकर यांच्या दौऱ्यानंतर समितीने पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करत गाव पातळीवर साखर कारखाना सुरू व्हावा अशी मागणी करणारे ७० हून अधिक ग्रामपंचायतीचे ठराव जमा केले आहेत. या शिवाय समिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी गाऱ्हाणे मांडणार आहे. समितीचे प्रयत्न सुरू असतांना प्रशासक मंडळ मात्र त्यादृष्टिने कोणतीच हालचाल करत नसल्याने जनमानसात प्रशासकीय मंडळाविरूध्द रोष वाढत आहे. सरकारने याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत नियमात शिथिलता आणत याच प्रशासकीय मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. या संदर्भातील पत्र ८ फेब्रुवारी २०१६ रोजी नगरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडून देण्यात आले. मात्र मधल्या तीन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर हे पत्र प्राप्त झाले. कारखाना सुरू होण्याचा जो कार्यकाळ होता, त्याच कार्यकाळात प्रशासकीय मंडळ ढिम्म राहिले. या दोन महिन्यात त्यांनी वेगवान हालचाली करत कारखाना सुरू केला तर त्याचा देखभालीत बराच वेळ जाणार आहे. दिवाळीनंतर कारखाना नियमित सुरू होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, सहकार विभागाच्या या धोरणामुळे कृती समितीच्या प्रयत्नांना खीळ बसली असून कारखाना सुरू होण्याचे चित्र अस्पष्ट झाले आहे. याबाबत समिती जूनमध्ये न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. कारखान्याला पत्र उशीरा दिले गेले असून कामगारांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

निसाका प्रशासकीय मंडळ

सहकार विभागाने निसाकावर नियुक्त केलेल्या प्रशासकीय मंडळात जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक व सहनिबंधक यांच्यासह भागवतबाबा बोरस्ते, पुंजाहरी शंकर काळे, सतीश मोरे, आनंदराव जाधव, सुधीर कराड, संजय मोरे, शरद कुटे आदींचा समावेश आहे. काही सदस्यांनी आधीच राजीनामा दिला आहे.