मुंबईच्या महापौरांच्या स्पष्टीकरणाने ‘भाजप’ची अडचण

नागपूर येथे आयोजित महापौर परिषदेत नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविषयी कोणताही ठराव एकमताने मंजूर झाला नसल्याचे परिषदेचे अध्यक्ष तथा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितल्याने ‘भाजप’च्या प्रतिनिधींची अडचण झाली आहे.

नाशिक पालिकेतील सत्ताधारी ‘भाजप’ आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. या वादाचे पडसाद महापौर परिषदेतही उमटले. मुंढे यांच्या कार्यपद्धतीविषयी नाशिकसह नवी मुंबईच्या महापौरांनी तक्रारी कथन केल्या, परंतु आयुक्तपदी कोणाची नेमणूक करायची, हा राज्य शासनाचा निर्णय असतो. यामुळे मुंढे यांच्याबद्दल परिषदेत कोणताही ठराव मंजूर केला गेला नसल्याचे महाडेश्वर सांगितले.

नागपूर येथील वनामती सभागृहात १८ वी महापौर परिषद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडली. नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी परिषदेत सहभाग घेत महापौरपदी काम करताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते हे कथन केले. आयुक्त मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर परिषदेत अधिक चर्चा झाल्याचे भानसी यांनी सांगितले. पालिकेत काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आयुक्तांनी कोणताही निर्णय घेण्याआधी महापौरांशी चर्चा करायला हवी. पालिकेच्या हिताविरोधात आयुक्त निर्णय घेत असतील तर त्यांच्यावर थेट कार्यवाहीचा अधिकार महापौर, सर्वसाधारण सभेला असावा. एकदा अंदाजपत्रक मंजूर झाले की, त्यातील विकास कामांचे विषय मंजुरीसाठी पुन्हा सर्वसाधारण सभेवर आणले जात नाही. विकास कामांचे विषय सर्वसाधारण सभेवर आणले जावेत, अशी मागणी त्यांनी केली. मुंढे यांच्या कार्यशैलीबद्दल महापौरांनी अनेक तक्रारी मांडल्यानंतर नवी मुंबईच्या महापौरांनी तोच सूर आळवला. अकोल्याच्या महापौरांनीही तो विषय मांडला. या घटनाक्रमानंतर अशा अधिकाऱ्याला कोणत्याही महापालिकेत नियुक्ती देऊ नये, असा ठराव परिषदेत मंजूर केला गेल्याचे सांगितले गेले.

मात्र या दाव्यातील हवा महापौर परिषदेचे प्रमुख मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी काढून घेतली आहे. परिषदेत तसा कोणताही ठराव मंजूर झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात महापौर रंजना भानसी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापौर परिषद अध्यक्षांचे म्हणणे योग्य असल्याचे सांगितले. परिषदेत मुंढे यांची कार्यपद्धती अधिक चर्चेचा विषय ठरली. परिषदेत यावर सविस्तर चर्चा झाली, नंतर ठराव केला जाईल, असे महापौरांनी सांगितले. मुंढे यांच्याबद्दल अकोल्याच्या महापौरांनी प्रस्ताव मांडल्याचा संदर्भ भानसी यांनी दिला. या घटनाक्रमाने ‘भाजप’मधील मुंढे यांच्याविरोधातील खदखद पुन्हा उघड झाली आहे. याआधी ‘भाजप’ने मुंढे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मुख्यमंत्र्यांनी तो मागे घ्यायला लावल्याने ‘भाजप’ पदाधिकाऱ्यांचा नाइलाज झाला होता.

मुंढे यांना हटविणे अवघड झाल्याने ‘भाजप’ने त्यांच्या विरोधात वातावरण निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. महापौर परिषदेत न झालेल्या ठरावाबद्दलचा संभ्रम हे त्याचे उदाहरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महापालिकेत आयुक्तपदी कोणाची नेमणूक करायची हा राज्य शासनाचा निर्णय आहे. नाशिकच्या महापौरांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळे काम करताना येणाऱ्या अडचणी परिषदेत कथन केल्या. त्याला जोडून नवी मुंबई, अकोल्याच्या महापौरांनी आपली मते मांडली. मात्र परिषदेत मुंढे यांच्याबद्दल, त्यांच्या नेमणुकीबद्दल कोणताही ठराव करण्यात आलेला नाही.

– विश्वनाथ महाडेश्वर, अध्यक्ष, महापौर परिषद आणि महापौर, मुंबई