भरारी पथकाकडून कारवाई

नाशिक : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा १२ वीला मंगळवारपासून सुरुवात झाली. परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त होण्यासाठी शिक्षण मंडळ प्रयत्नशील असले तरी पहिल्याच दिवशी नाशिक विभागात १९ जणांना कॉपी करताना भरारी पथकांनी ताब्यात घेतले.

इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडविताना भरारी पथकाला १९ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. नाशिक जिल्ह्य़ात सर्वाधिक म्हणजे १० विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली  असून धुळे जिल्ह्य़ात परिस्थिती सामान्य राहिली.

जळगाव येथे सात, नंदुरबार येथे दोन विद्यार्थी कॉपी करताना सापडले. त्यांच्यावर शिक्षण मंडळाने आवश्यक कारवाई करत पुढील परीक्षेला बसण्यास बंदी केली आहे.

पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा होता. विभागात धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक येथून एक लाख ६५ हजार ३०५ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. इंग्रजी विषयाची विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती आणि परीक्षेचा पहिलाच दिवस असल्याने काही पालकांनी परीक्षा केंद्रापर्यंत विद्यार्थ्यांची सोबत केली. पालकांना परीक्षा केंद्राच्या आत येण्यास मज्जाव करण्यात आला. केंद्राबाहेरील रस्त्यावर वाहन लावत त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना सोडण्याची सूचना केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केल्याने पालकांना माघारी फिरावे लागले. काही पालक पेपर संपेपर्यंत केंद्राभोवती थांबून राहिले. तर काहींनी घरचा रस्ता धरला.