News Flash

मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी लिहिली फेसबुक पोस्ट

महेश छोटू शेवाळे

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पळाशी या गावातील सरपंच आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. महेश छोटू शेवाळे (वय २१) असे या मृत तरुणाचे नाव आहे. सरपंचासह गावातील दोन व्यक्तिंनी वडिलांवर खोट्या केसेस दाखल केल्याच्या नैराश्यातून त्याने आपले जीवन संपवले. ही घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. त्याने आपल्या शेतातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेत स्वतःचे आयुष्य संपवले. याप्रकरणी महेशचे काका वाल्मिक शेवाळे यांनी नांदगाव पोलिसांत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयिताना ताब्यात घेतले असून एकाचा शोध सुरु आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील सरपंच अशोक पांडुरंग सांगळे, अविनाश दादा शेवाळे (दोघेही रा.पळाशी) आणि प्रशांत सांगळे (रा.मनमाड) यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून महेश शेवाळे या युवकाने आत्महत्या केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, मयत महेशच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत रात्री उशिरापर्यंत ‘रास्ता रोको’ करण्यात आला. रात्री साडेबाराच्या सुमारास  हा ‘रास्ता रोको’ मागे घेण्यात आला.

“राज..होऊ शकेल तर माफ करा..तुमच्या या मावळ्याला पण आता नाही हो सहन होतं..खरं तर मी एवढा कमजोर नाही आहे हो..पण आता पर्याय नाही..निदान मी गेल्यावर जरी हे सगळं ठीक झालं ना तरी बस होईल..अशी पोस्ट देखील मयत महेश याने फेसबुकवर आत्महत्येपूर्वी टाकली होती. मयत महेश शेवाळे हा नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कुलमध्ये बी.बी.ए.चे शिक्षण घेत होता. याबाबत नांदगाव पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, मयत महेश हा चुलते वाल्मिक त्र्यंबक शेवाळे यांच्या घरी जावून म्हणाला की, गावातील सरपंच अशोक पांडुरंग सांगळे, अविनाश दादा शेवाळे, प्रशांत अशोक सांगळे हे मनमाड येथून मुले घेवून दहशत करून सांगतात की, आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चांगली वट आहे. तुम्ही आमचे काहीच करू शकत नाही. तुमच्या घरातील कोणालाच नोकरीला लागू देणार नाही. गावात व्यवस्थित जगू देणार नाही, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुम्हाला संपवून टाकू, असा दम देत आहेत. चुलत्यांना हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर तो शेतात निघून गेला. यावेळी त्याने चुलत भाऊ ओमप्रकाश यास शेतात मदतीला ये असेही सांगितले. चुलत भाऊ ओमप्रकाश हा शेतात गेल्यानंतर त्याला मयत महेश याने कडुलिंबाच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. घरातील नातेवाईकांना ओमप्रकाश याने फोनद्वारे ही घटना कळवली. मयत महेश याच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी देखील आढळून आली असून त्यात ‘ मी महेश दिलीप शेवाळे आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीत आहे की,पळाशी येथील सरपंच अशोक सांगळे व त्यांचे मित्र अविनाश सांगळे हे माझ्या वडिलांना सतत मानसिक त्रास द्यायचे व खोट्या पोलीस केस करून दाखल करायचे. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे. त्यांनी यापूर्वी माझ्यावर ३०७ कलम ही खोटी केस केलेली आहे, असा उल्लेख केलेली त्याच्या हस्ताक्षरात चिठ्ठी आढळून आली.

4db15918-5968-4f7e-9921-0b75f361a163

मयत महेश शेवाळे याने नमूद केलेल्या चिठ्ठीवरून आणि त्याच्या वडिलांविरोधात वेळोवेळी पोलिसात खोट्या केसेस दाखल केल्या म्हणून अशोक पांडुरंग सांगळे, अविनाश दादा शेवाळे, प्रशांत अशोक सांगळे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचे वाल्मीक त्र्यंबक शेवाळे यांनी पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, याप्रकरणी सरपंच अशोक सांगळे आणि अविनाश शेवाळे या दोन्ही संशयिताना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. या घटनेतील तिसरा संशयित प्रशांत सांगळे याचा पोलीस शोध घेत असून याप्रकरणी या तिघा संशयितांविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेशच्या नातेवाईकांनी आज सकाळी दहाच्या सुमारास महेशचा मृतदेह ताब्यात घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 12:39 pm

Web Title: one young boy struggling with another form of isolation depression and suicide case in nashik
Next Stories
1 पावसावर खापर
2 सत्ताधाऱ्यांकडून पालिका अधिकारी फैलावर
3 सराफ बाजारात दुसऱ्या दिवशीही तळघरांमध्ये पाणी कायम
Just Now!
X