आरोग्य विभागातर्फे त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठे येथे प्रकल्प राबविण्यास सुरूवात

जिल्ह्य़ास कुपोषणाचा विळखा पडत असताना दोन हजाराहून अधिक बालके कुपोषित असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळले आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा ‘कुपोषणमुक्त’ करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने  जिल्ह्य़ात त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ येथे आरोग्य विभागाने पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे.

कुपोषण, माता-बाल मृत्यू यांचा अभ्यास करताना गरोदरपणात मातेला सकस पोषण आहार न मिळाल्याने, कधी बाळात जन्मत: असणारे व्यंग, जोखमीची बाळंतपणे अशा विविध कारणांमुळे जिल्ह्य़ात माता बालमृत्यू दर बऱ्यापैकी राहिला आहे. यामध्ये आदिवासीबहुल असलेल्या त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ येथे बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१६-१७ च्या आकडेवारीनुसार पेठमध्ये सर्वाधिक म्हणजे १८ टक्के, सुरगाणा येथे १५, तर त्र्यंबकेश्वर येथे १६ टक्के अर्भक मृत्यूचा दर राहिला. या पाश्र्वभूमीवर मागील वर्षी मे-जून मध्ये मातृत्व अ‍ॅपच्या मदतीने गरोदर मातांसाठी एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला. मातृत्व अ‍ॅपच्या मदतीने या तीनही तालुक्यातील गरोदर मातांना शोधायचे, त्या ज्या ठिकाणी राहतात तेथील अंगणवाडी सेविका, आशा यांच्याकडून त्यांना आरोग्य सेवा घेण्यासाठी प्रवृत्त करायचे, त्यांच्या गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात वेळोवेळी तपासणी करणे, रक्ताची पातळी तपासणे, बाळाची वाढ व्यवस्थित होते की नाही हे पाहण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आणणे, विशेष उपचाराची गरज असल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करणे, तिला जननी-शिशू सुरक्षा, जननी सुरक्षा, मानव विकास अशा विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आला आहे.

बाळ झाल्यानंतर त्याचे बऱ्याचदा अपुरे वजन, न्युमोनिया, जंतु संसर्ग यामुळे त्यांना त्रास होतो. याबाबत वेळीच उपचार न झाल्यास काही वेळा बाळ दगावण्याची शक्यता असते. आशा सेविकांना याबाबत प्राथमिक प्रशिक्षण देत त्यांच्या जवळ या तीनही आजाराबाबत औषधांचे संच देण्यात आले आहेत. जेणेकरून बाळाला प्राथमिक उपचार मिळतील. या उपचाराने बाळाला आराम न पडल्यास त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. यामुळे बालमृत्य दर नियंत्रणात येण्यास मदत झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. या संदर्भात आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही.

नवजात बालकांवर तातडीने उपचार

नवजात बालकांवर कुपोषण किंवा अन्य आजारासंदर्भात तातडीने उपचार व्हावेत यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता केंद्र तर नाशिक, दिंडोरी, कळवण आणि सुरगाणा येथ पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच इगतपुरी, पेठ, त्र्यंबक मालेगाव येथे बाल उपचार केंद्र आहेत. ग्राम विकास आरोग्य केंद्र (व्हीसीडीसी) सोबत गरज पडल्यात १०६ प्राथमिक आरोग्य केंद्रात बाल उपचार केंद्र सुरू करण्यात येतील.

डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी