पत्नीला जाळून तिला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकले. त्यानंतर तिला जखमी अवस्थेत रुग्णालयाच्या दारात सोडून पळ काढणाऱ्या पतीला नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन बदलापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज मिश्रा पत्नीसह ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे किर्ती पोलीस लाईनजवळ अद्वय अपार्टमेंटमध्ये राहत होता. क्षुल्लक कारणावरून पत्नीशी भांडण केल्यानंतर तिला जिवंत जाळण्याचा त्याने प्रयत्न केला. अर्धवट जळालेल्या सोनीला त्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकले. स्थानिकांना संशय येऊ नये म्हणून मनोजने तिला आधी उल्हासनगर आणि त्यानंतर मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जे. जे. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असतानाच मनोजने तिथून कोणालाही न कळवता पळ काढला. तो रेल्वेने नांदगाव येथे गेला. तेथे एका देशी दारुच्या दुकानाजवळ नशेत मी बायकोचा खून केला, तिला जाळून मारले अशी बडबड करत होता. याबाबत खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली. तसेच एका दुकानदारानेही एक व्यक्ती दारु पिऊन दुकानासमोर पडल्याची माहिती ठाणे अंमलदार रमेश पवार यांना दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहोचले. बदलापूरमध्ये पत्नीचा खून करून पसार झालेला हाच इसम असावा, असा संशय पोलिसांना आला. त्यांनी मनोजला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. त्याच्याकडे तीन मोबाईल फोन आणि पाच सिमकार्ड असल्याचे आढळून आले. दुसरीकडे बदलापूर पोलिसही त्याच्या मागावर होते. मात्र, त्याने नाशिकमध्ये मोबाईलमधून सीमकार्ड काढून टाकल्याने त्याचा ठावठिकाणा मिळत नव्हता. नांदगाव पोलिसांनी बदलापूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी आधारकार्डवरून त्याची ओळख पटली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. बदलापूर पोलीस ठाण्यातही मनोजविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. बदलापूर पोलिसांनी काल रात्री उशिरा नांदगाव येथे येऊन मनोजला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.