चीनमध्ये होणाऱ्या जागतिक जलरंग कार्यशाळेसाठी जगभरातून निवडलेल्या १३ सवरेत्कृष्ट चित्रकारांमध्ये नाशिकच्या प्रफुल्ल सावंत यांची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. सावंत हे या कार्यशाळेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. तसेच चीनमधील ‘री इंटरप्रीटेशन २०१६’ या जागतिक जलरंग चित्र प्रदर्शनात त्यांच्या तीन कलाकृती झळकणार आहेत.

सर्वच क्षेत्रात वेगाने प्रगती करणारे चीन कला व क्रीडा क्षेत्राच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष देत आहे. त्या अंतर्गत चीनमधील कलादालन व संग्रहालयांकडून विविध देशातील चित्रकारांची निवड करून त्यांच्या कार्यशाळांचे आयोजन केले जाते. स्थानिक चित्रकारांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे असा त्यांचा प्रयत्न असतो. याच अनुषंगाने सुझाऊ मिंग गॅलरी ऑफ आर्टतर्फे शांघाईजवळील वल्र्ड हेरिटेज सुझाऊ वॉटर टाऊन येथे १२ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत ‘री इंटरप्रीटेशन २०१६ इंटरनॅशनल कंटेपररी वॉटर कलर’ या प्रदर्शन होणार आहे. त्यात २८ देशातील नामवंत चित्रकारांच्या जलरंगातील वैशिष्टय़पूर्ण कलाकृती प्रदर्शित केल्या जाणार आहेत. याच प्रदर्शनात विविध देशातील १३ चित्रकारांना १२ मार्चपासून पाच दिवसीय जलरंग कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या निमित्ताने चीनमध्ये पाचव्यांदा देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणारे सावंत हे पहिलेच भारतीय चित्रकार ठरले आहेत.

जागतिक जलरंग प्रदर्शनात सावंत यांच्या तीन चित्रकृतींची निवड झाली आहे. त्यात फर्स्ट लाइट, गोल्डन लाइट अ‍ॅट बनारस तर गोल्डन लाइट अ‍ॅट गोंदेश्वर या नाशिकमधील स्थळांच्या चित्राचा समावेश आहे. ही तीनही चित्रे जलरंग माध्यमात असून २२ बाय ३० सेंटीमीटरच्या आकारात काढण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली. राजस्थान, वाई व नाशिक येथे प्रत्यक्ष स्थळांवर चित्रित केली आहेत. आकारांची रचना व रंगसंगती चित्रांचे सौंदर्य अधिकच खुलवते. चीनमध्ये वर्ल्ड हेरिटेजच्या स्थळांना सावंत हे चित्रबद्ध करून कलेचे धडे देणार आहेत.