22 November 2019

News Flash

मनमाडसाठी करंजवण जलवाहिनी योजनेला मान्यता

दरडोई दररोज १३५ लिटर प्रमाणे पाणी देणाऱ्या योजनेचा खर्च २९७ कोटी रुपये आहे.

मनमाड येथे फटाके फोडून निर्णयाचे स्वागत केले. (छाया - अपूर्व गुजराथी)

शहराच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी प्रस्तावित ३९७ कोटी रुपयांच्या करंजवण जलवाहिनी योजनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तत्त्वत: मान्यता दिली. याची माहिती शहरात येताच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकात्मता चौकात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

या योजनेबाबत मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक झाली. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार भारती पवार, जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभापती मनीषा पवार आदी उपस्थित होते. सुमारे ३०० कोटींच्या अवाढव्य खर्चाच्या या योजनेची देखभाल आणि लोकवर्गणीचा खर्च जर पालिकेला झेपणार असेल तर राज्य शासन करंजवण योजनेला मंजुरी देत असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांसमोर केले.

योजनेचा सविस्तर अहवाल जीवन प्राधिकरण, नगरविकास विभागाकडून त्यांनी तांत्रिक मंजुरीसाठी मागविला असल्याची माहिती खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली. या योजनेसाठी सुमारे ४५ कोटींची लोकवर्गणी भरावी लागणार आहे. त्याची तरतूद मनमाड नगरपालिका कशी करणार, यावर बैठकीत चर्चा झाली. त्यावर मनमाड पालिकेकडे १० कोटी रुपये उपलब्ध असून ऑइल कंपन्या तसेच इतर स्रोतातून आम्ही उर्वरित रक्कम उभी करू, अशी ग्वाही नगरपालिकेतर्फे नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, शिवसेना गटनेते गणेश धात्रक यांनी दिली. प्रारंभी जलसंपदामंत्री महाजन यांनी करंजवण योजना कशी फायदेशीर आहे आणि ती मंजूर होणे कसे गरजेचे आहे हे मुख्यमंत्र्यांना पटवून दिले. खासदार डॉ. पवार यांनी या प्रश्नावर मनमाड शहरातील जनतेच्या प्रामुख्याने महिलांच्या भावना तीव्र असून अनेक आंदोलने, उपोषणे झाल्याचे सांगत या योजनेला तातडीने मंजुरी देण्याचा आग्रह धरला. मुख्यमंत्र्यांनी मनमाडच्या प्रस्तावित करंजवण योजनेला हिरवा कंदील दिला. या योजनेसाठी ४५ कोटी रुपयांचा निधी लोकवर्गणीपोटी उभारणे ही आव्हानात्मक बाब असून राज्य शासन त्यासाठी टप्पे करून देईल तसेच इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आदी इंधन कंपन्यांची साठवणूक केंद्रे मनमाडजवळ आहेत. त्यांच्याकडून सीएसआर निधी मिळविण्यासाठीही आपण मदत करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.  बैठकीला जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती मनीषा पवार, रत्नाकर पवार, प्रवीण पवार, सचिन दराडे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, विनय आहेर, महेंद्र शिरसाठ, डॉ. अमोल गुजराथी, प्रवीण बोडखे, डॉ. सुहास जाधव आदी उपस्थित होते.

अशी आहे करंजवण योजना

मनमाडकरांना करंजवण धरण ते मनमाडच्या वाघदर्डी धरणापर्यंत ८२.५ किलोमीटरची जलवाहिनी टाकून पाणी आणण्यात येणार. दरडोई दररोज १३५ लिटर प्रमाणे पाणी देणाऱ्या योजनेचा खर्च २९७ कोटी रुपये आहे. योजनेचा आराखडा, अंदाजित खर्च तयार आहे. त्रुटी पूर्ण करून योजना जीवन प्राधिकरण विभागातर्फे नगरपरिषद संचालनालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

First Published on June 13, 2019 1:02 am

Web Title: recognition of karanjwan water supply scheme for manmad
Just Now!
X