परिसरातील नागरिकांकडून संशय, पोलिसांपर्यंत माहिती पोहोचविपर्यंत मजल

नाशिक : करोना विषाणूचा वाढता संसर्ग, समाज माध्यमातून पसरणाऱ्या अफवा, दिवसागणिक प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये होणारी वाढ याचा परिणाम लोकांच्या मनात करोनाची भीती वाढण्यात झाला आहे. करोना विषाणूचा वाढता फैलाव, टाळेबंदी पाहता घरमालकांना विशेष सूचना करत भाडेकरूंना अभय देण्यात आले आहे. परंतु, काही कारणास्तव स्थलांतर करणाऱ्या भाडेकरूंना त्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या संशयी नजरांना तोंड द्यावे लागत आहे. तर काही ठिकाणी विरोध सहन करावा लागत आहे. दुसरीकडे काही उत्साही नागरीक पोलिसांपर्यंत माहिती देण्याच्या नादात त्यांची डोकेदुखी वाढवित आहेत.

करोनाचा उद्रेक मालेगावात मोठय़ा प्रमाणावर आहे. याशिवाय ग्रामीण भागातही करोनाचा विळखा पडण्यास सुरूवात झाली आहे. करोनामुळे लागु झालेली टाळेबंदी श्रमजीवी सह अन्य नोकरदारांच्या अडचणीत भर घालत आहे. टाळेबंदीमुळे हातातील काम सुटल्याने काही मंडळी भाडे परवडत नसल्याने, कामाचे ठिकाण दूर असल्याने, स्थानिकांच्या करोनाविषयक अतिसावध पवित्र्यामुळे शहर परिसरातच स्थलांतर करत आहेत. स्थलांतर करणारे असे भाडेकरू हे करोनाग्रस्त भागातूनच आले असावेत, असा गैरसमज करत स्थानिकांकडून त्यांना प्रखर विरोध होत आहे. परिसरातील रिकाम्या खोलीत रात्रीतून सामान येऊन पडला की सकाळीच त्या वसाहतीतील लोक एकत्र येत नवख्या भाडेकरूवर चौकशीचा भडिमार करत त्याला तेथे राहण्यास ठाम विरोध दर्शवित आहेत. वास्तविक स्थलांतर करणारे भाडेकरू किंवा इतर हे वैद्यकीय तपासणी करून आलेले असतात. किंवा वैद्यकीय तपासणीसाठी तयार असतात. परंतु, करोना संसर्गाच्या भीतीमुळे त्यांना स्थानिकांच्या विरोधास तोंड द्यावे लागते. काही मंडळी थेट लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांना हाताशी धरत पोलीस ठाणे गाठत सुशिक्षित नागरीक असल्याचे कर्तव्य पार पाडत आहेत. परिणामी पोलिसांच्या कामात अडथळे येत आहेत. वास्तविक, करोनाचा वाढता संसर्ग पाहता कोणीही आपले रहाते घर सोडू नये, अशी सूचना पोलिसांकडून सातत्याने होत आहे. वैद्यकीय तपासणी केली असली तरी आणि करोनाचा अहवाल नकारात्मक असला तरी त्यांनी घर बदलल्यानंतर स्वतला अलगीकरण करून घ्यावे, नागरिकांनीही संयम राखत सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.