पोटनिवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीचा विजय

नाशिक : राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या महापालिकेच्या प्रभाग २६ आणि २२ मधील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने दोन्ही जागांवर विजय मिळवत सत्ताधारी भाजपला धक्का दिला. प्रभाग २६ मध्ये शिवसेनेचे मधुकर जाधव यांनी ‘मनसे’चे दिलीप दातीर, तर प्रभाग २२ मध्ये राष्ट्रवादीच्या जगदीश पवार यांनी भाजपच्या विशाखा शिरसाठ यांना पराभूत केले. महापौर निवडणुकीवेळी फसलेला काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी हा महाविकास आघाडीचा प्रयोग पोटनिवडणुकीत यशस्वी झाला.

राज्यात सत्तांतरानंतर भाजपची सत्ता असणाऱ्या महापालिकेतील पोटनिवडणुकीकडे सर्वाचे लक्ष होते. भाजपच्या सत्ताकाळात माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे महापालिकेची जबाबदारी होती. त्यांच्या नेतृत्वात भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. राज्यातील सत्ता गेल्यानंतर स्थानिक पातळीवरील राजकारणात बदल होऊ लागले. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यामुळे भाजप स्पर्धेतदेखील राहिली नाही. तत्पूर्वी, नाशिकचे महापौरपद भाजपने मनसेचे प्रत्यक्ष तर काँग्रेसच्या अप्रत्यक्ष सहकार्याने कसेबसे राखले होते. या घटनाक्रमामुळे पोट निवडणुकीच्या निकालाविषयी उत्सुकता होती.

मतदानावेळी मतदारांचा निरुत्साह ठळकपणे अधोरेखीत झाला. कमी झालेले मतदान कोणत्या पथ्यावर पडेल याची चर्चा सुरू झाली. या सर्व प्रश्नांची उत्तरे शुक्रवारी मतमोजणीतून स्पष्ट झाली. सातपूरच्या क्लब हाऊस येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. दोन्ही जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली.

नाशिकरोड विभागातील प्रभाग २२ हा भाजपचा प्रभाग. भाजप नगरसेविका सरोज आहिरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्या विधानसभेत पोहोचल्या. हा प्रभाग भाजपला गमवावा लागला.

राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जगदीश पवार यांनी ३३८८ मतांनी भाजपच्या विशाखा शिरसाठ यांच्यावर विजय मिळवला. पवार यांना ४९१३ तर शिरसाठ यांना १५२५ मते मिळाली. सिडको विभागात प्रभाग क्रमांक

२६ च्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांनी मनसेचे दिलीप दातीर यांच्यावर २८०० हून अधिक मतांनी विजय मिळवला. जाधव यांना ५८६५ तर दातीर यांना ३०५३ मते मिळाली. विधानसभा निवडणुकीसाठी दातीर यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता.

विधानसभा निवडणुकीपाठोपाठ त्यांना महापालिका पोटनिवडणुकीत पराभव सहन करावा लागला. निकालाने सत्ताधारी भाजपची एक जागा कमी झाली, तर सेनेने आपली जागा राखली. राष्ट्रवादीचे संख्याबळ एकने वाढले आहे.