प्रचंड इच्छाशक्तीला परिश्रमाची जोड दिल्यास सर्व काही शक्य असते, हे नाशकातील इगतपुरी तालुक्यातील घोटीतील नीलेश भास्कर बोराडे याने दाखवून दिले आहे. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याचे सातवीतच शिक्षण सुटले, पुढे खाणकाम करायला सुरुवात केली. हे सर्व करत असताना त्यानं जिद्द सोडली नाही. खाणकाम करून दररोज ३० किलोमीटर मुंबई – नाशिक महामार्गावर अनेकांवेळा धावतांना कसरत करत होता.

१३ व्या वर्षी शिक्षण सुटल्यानंतरही १६ वर्षानंतर तिशीत गेल्यानंतरही शिक्षणाची इच्छा सुटली नव्हती. तिसाव्या वर्षा नीलेशने दहावीची परीक्षा दिली अन् पासही झाला. नीलेशला दहावीत ६५ टक्के गुण मिळाले. प्रचंड इच्छाशक्तीला परिश्रमाची जोड दिल्यास सर्वकाही शक्य असते हे त्यानं दाखवून दिलं. स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन नावलौकिक करणाऱ्या नीलेशचे नाशिकमध्ये कौतुक होत आहे.

मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. निकालात लक्षणीय वाढ झाली आहे. करोना टाळेबंदीत शेवटचा भूगोलाचा पेपर रद्द केला गेला होता. या विषयाचे सरासरी गुण द्यावे लागले. निकालावर त्याचाही प्रभाव पडल्याचे दिसत आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक संगणक, भ्रमणध्वनीकडे डोळे लावून बसले होते. या परीक्षेला एकूण एक लाख ९७ हजार ९७६ विद्यार्थी बसले. त्यातील एक लाख ८५ हजार ५५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाचा जिल्हानिहाय विचार केल्यास नाशिक (९४.९३), धुळे (९४.५०), जळगाव (९३.५१), नंदुरबार (८८.१४) अशी टक्केवारी आहे. विभागात परीक्षा देणाऱ्या एकूण मुलांपैकी एक लाख ७१७ विद्यार्थी अर्थात ९२.३० टक्के उत्तीर्ण झाले. मुलींचे हेच प्रमाण ८४ हजार ८३८ असून टक्केवारी ९५.४७ इतकी आहे. विशेष प्रावीण्य आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. विशेष प्रावीण्यप्राप्त ६७ हजार ४६७, प्रथम श्रेणीत ७१ हजार ३३४, द्वितीय श्रेणी ३८ हजार ९७९ तर पास श्रेणीत ७७६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.