ऊसतोड कामगाराच्या मुलीची पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत झेप

येवला : स्पर्धा परीक्षा म्हणजे महागडी शिकवणी, इंग्रजीवर प्रभुत्व, हा समज मोडीत काढत येवला तालुक्यातील दुर्गम असलेल्या खरवंडी भागातील ऊसतोड करणाऱ्या कुटुंबातील एका युवतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात १४ वा क्रमांक पटकावला. सीमा खंडागळे असे या युवतीचे नाव असून अथक प्रयत्न आणि जिद्दीतून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतचा प्रवास पूर्ण करत तिने यशाला गवसणी घातल्याची भावना खंडागळे कुटुंबीयांनी व्यक्त केली.

नाशिक जिल्ह्य़ातील दुर्गम तसेच दुर्लक्षित म्हणून येवला तालुक्यातील खरवंडी गावाकडे पाहिले जाते. याच गावात काशिनाथ खंडागळे यांच्या वडिलांसह पाच चुलते असे पाच जणांचे एकत्रित कुटुंब राहते. घरची परिस्थिती हलाखाची. शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने आर्थिक स्थैर्य असे नाही. ओढाताण अनुभवल्यामुळे मुलांना शेतीकडे फिरकू द्यायचे नाही, त्यांना शिक्षण द्यायचे यासाठी खंडागळे कुटुंबाने प्रयत्न सुरू केले.  सीमाने काकांनी ठरवून दिलेल्या पायवाटेवरून चालण्यास सुरुवात केली.

गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मनमाड येथे सेंट झेवियर मनमाड बोर्डिग शाळेत माध्यमिक शिक्षण सीमाने पूर्ण केले. पोलीस खात्यात जाण्याचा मानस असल्याने हवालदार भरतीची जाहिरात पाहताच तिने तयारीला सुरुवात केली. अवघ्या एका गुणाने तिची संधी हुकली. प्रयत्न न सोडता तिने स्पर्धा परीक्षेचा जोमाने अभ्यास सुरू केला. महाविद्यालयीन शिक्षण पदव्युत्तपर्यंत घेत असताना इंग्लिश, इतिहास विषयांची निवड केली.

नाशिकच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात राहून अभ्यासाची तयारी सुरू केली. मार्गदर्शन नसल्याने आपलं काय चुकते हे न समजल्याने ती घोकमपट्टी करत राहिली. मात्र त्यानंतर सीमाला धर्मादाय आयुक्तालय कार्यालयातील लेखापाल गणेश सास्ते यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी प्रवेश अर्ज भरण्यापासून, परीक्षा शुल्क भरणे, अभ्यास कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केले.

अभ्यास करत असताना वडील आणि अन्य नातेवाईकांनी सातत्याने तिला पाठिंबा दिला. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून १४ व्या क्रमांकाने यश मिळवले. घरच्यांचा पाठिंबा तसेच वेळप्रसंगी समाजाने केलेल्या अवहेलनेने आज वरचा प्रवास यशस्वी झाला.

परीक्षेच्या माध्यमातून तहसीलदार होण्याचे स्वप्न असल्याचे सीमा यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने तिच्या उल्लेखनीय यशाबद्दल येवला पंचायत समिती उपसभापती रूपचंद भागवत यांनी तिचा सत्कार केला.

सीमाने मिळवलेले यश प्रेरणादायी

कुठलीही शिकवणी न लावता सीमाने मिळवलेले यश ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. अनुकूल परिस्थिती असताना शिक्षण घेण्यास टाळाटाळ करणारे आणि प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग शोधत दुर्गम भागातून मुलगी म्हणून शिकणे तसेच समाजाच्या रोषाला सामोरं जाणं खरंच किती विरोधाभास. असे असताना सीमाचा आदर्श नक्कीच गावाकडच्या तरुणांना घेण्यासारखा आहे.

– रूपचंद भागवत, उपसभापती, पंचायत समिती येवला