राष्ट्रवादी आमदाराचे मुख्यमंत्र्यांना साकडे

शहरात गेल्या काही दिवसात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बळावली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन अपयशी ठरल्याची नागरिकांची भावना आहे. या पाश्र्वभूमीवर,गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेबाबत बठक घेऊन सक्षम पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा आमदार जयवंतराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विरोधी आमदार या मुद्यावर मुख्यमंत्र्यांकडे दाद मागत असताना सत्ताधारी भाजपच्या आमदार आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याविषयी नाशिककरांमध्ये कमालीची नाराजीची भावना आहे. गेल्या काही महिन्यात गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढत असताना पोलीस आयुक्त मात्र तशी काही स्थिती नसून नाशिकमध्ये शांतता असल्याचे सूचित करत आहे. काही वर्षांपूर्वी नाशिक हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जात होते. तत्कालीन आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी कठोर कारवाई करत शहरात पोलिसांचा धाक निर्माण केला. त्यांच्या काळात शहराची वाटचाल खऱ्या अर्थाने शांततेकडे झाल्याचे पहावयास मिळाले. परंतु, त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर जगन्नाथन यांच्या काळात शहरात खून, हाणामारी, वाहनांची जाळपोळ, लुटमार, सोन साखळी चोरी आदी गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री यांच्याकडे साकडे घालण्यास सुरूवात केली आहे.

भाजपच्या आ. प्रा. फरांदे यांनी पोलीस यंत्रणेचा कोणताही दरारा नसल्याने या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाब आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे. गुन्हेगारांना जरब बसेल अशी कृती पोलिसांनी तातडीने राबविणे गरजेचे आहे. तडीपार गुंडांना हद्दपार करावे, कोम्बिंग ऑपरेशन राबवावे आणि नाशिक भयमुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे असल्याने फरांदे यांच्या मागणीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे आ. जाधव यांनी नाशिकच्या ढासळत्या कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी केली. नाशिककरांना अस्मानी व सुलतानी संकटाना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळाची दाहकता व गुन्हेगारीचे वाढत जाणारे प्रमाण यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मागील चार महिन्यांत नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरु आहे. सोनसाखळी चोरी, वाहन जाळपोळ सारखे गुन्हे गुन्हेगारांना किरकोळ वाटू लागले आहे. त्यात पोलिसांना हे गुन्हेगार सापडू नये ही आश्चर्याची बाब आहे. दरोडा, चोरी, अनतिक व्यवसाय, जुगार यातील आरोपी शहरात मोकाट फिरतात. काही दिवसांपासून वाहनांची जाळपोळ आणि खूनाच्या सत्रामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुंड कायदा-सुव्यवस्थेचे िधडवडे काढत असतांना पोलीस प्रशासन सुस्त आहे. पोलिस दलात कधी नव्हे इतकी हतबलता आल्याचे दिसून येते. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक तर दूर, नाशिकमध्ये पोलिसांचे अस्तित्व आहे की नाही, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कालचे विरोधक आज सत्ताधारी झाले आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत आरोप करणारे आज मूग गिळून गप्प बसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये कायदा-सुव्यवस्थेबाबत आढावा बठक घेऊन सक्षम पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अन्यथा नाशिककर रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.