नाशिक : महाविद्यालयीन नाटय़प्रेमी विद्यार्थ्यांना ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याने या स्पर्धेच्या रंगमंचावर आपली कला दाखविण्याची संधी मिळणे हे भाग्याचे असल्याचा सूर सहभागी कलाकार आणि मार्गदर्शकांकडून निघत आहे. नाटय़-संगीत-अभिनय यांची कुठलीही पार्श्वभूमी नसतांना लोकांकिकेचे व्यासपीठ मिळाले याचा कोण आनंद विद्यार्थ्यांना आहे. स्पर्धेतुन भरपूर काही शिकायला मिळाले. महत्वाचे म्हणजे या माध्यमातून आम्ही घडत असल्याचे मत येथील महाकवी कालिदास कलामंदिरातील नाटय़ परिषदेच्या सभागृहात आयोजित स्पर्धेच्या विभागीय प्राथमिक फेरीतील पहिल्या दिवशी स्पर्धक तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांनी मांडले.
अडचणींवर मात करणे महत्वाचे
मी इयत्ता १० वीत असतांना आत्महत्येचा प्रयत्न केला. एकाने मला त्यापासून परावृत्त केले होते. आजही काही वेळा नैराश्य आल्यावर मी मित्रांसोबत चर्चा करतो. आपल्याला येणाऱ्या अडचणींमध्ये आत्महत्या हा पर्याय नाही. अडचणी क्षुल्लक असतात, पण त्यावर मात करता आली पाहिजे.
– प्रा. डॉ. राज त्रिभुवन (म.स.गा. महाविद्यालय, मालेगाव)
तरूणांना नाटय़ऊर्जा देणारी स्पर्धा
लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा म्हणजे तरूणांना खुणावणारे व्यासपीठ आहे. त्यांना त्यांच्या भावना, विचार थेट मांडण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होत आहे. स्पर्धेत सहभागी होत असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. समाजातील ‘वृध्दांचे पालकत्व’ हा विषय मांडण्याचा आमच्या महाविद्यालयातील मुलांनी प्रयत्न केला. याचा आनंद वाटतो.
– प्रा. उज्वला कुलकर्णी (भोसला कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक)
प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न
वृध्दाश्रम आणि वृध्दांचे प्रश्न जवळून पाहिले आहेत. रोज एक अंध आजोबा बघतो. त्यांना रोजचे व्यवहार करतांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे प्रश्न याची जवळून अनुभूती घेतली. घरातही काही ठिकाणी असेच काही प्रश्न आहेत. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न ‘खेळ तारूण्याचा’ एकांकिकेतून केला.
– सारंग ताजणे (भोसला कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक)
भूमिकेचे आव्हान
‘सकिना’ची भूमिका आव्हानात्मक होती. आठवडाभरात देशात अत्याचाराच्या तीन घटना घडल्या. खूप हादरली. ‘खोल दो’मधील सकिनाही अशीच पीडित आहे. महिलांवरील अत्याचार धर्म, पंथ, जात याचा विचार न करता होत राहतात. काळ बदलला तरी परिस्थिती तीच आहे. सकिनाची भूमिका आव्हानात्मक होती. वडिलांचा स्पर्श झाल्यानंतर तिने केलेली कृती शब्दात मांडता येण्यासारखी नाही.
– मोनाली डांगे (के.टी.एच.एम, महाविद्यालय, नाशिक)
दोन वर्षांपासूनचे प्रयत्न फळास
लोकसत्ता लोकांकिकेत सहभागी होण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न करत होतो. पहिल्यांदाच रंगमंचावर या स्पर्धेच्या माध्यमातून येत आहे. लोकांकिका नव्या कलाकारांना एक चांगली संधी उपलब्ध करून देत आहे. त्या संधीचे सोने करता आले पाहिजे. महिनाभरात महाराष्ट्रातील प्रत्येकाने राजकारणाचे वेगवेगळे प्रयोग पाहिले. त्याच्याशी मिळतं जुळतं काही एकांकिकेत प्रमुख भूमिकेतून मांडले आहे.
– अथर्व लाखलगांवकर, (न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय, नाशिक)
अल्पावधीतील कसरत
विद्यापीठाच्या परीक्षा आटोपल्यानंतर अवघ्या आठ ते १० दिवसात ‘वेन्डेट्टा’ एकांकिका बसवली. वेगळा अनुभव आहे. नाटकात काम करायचे ही इच्छा होती. ती या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण झाली. परीक्षकांनी केलेल्या सुचनांचा विचार करून एकांकिकेत काही आवश्यक बदल करण्यात येतील.
-विशाल वाघ, (झेड.बी. पाटील महाविद्यालय, धुळे)
हसत खेळत बोलण्याची संधी
आपल्या सभोवताली वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्महत्येचे प्रकार सर्रासपणे होत आहेत. आत्महत्या हा पर्याय नाही, हे समजविण्याचा प्रयत्न एकांकिकेतून केला आहे. त्यासाठी तत्वज्ञानाचे डोस न पाजता हसत-खेळत संदेश देण्यात आला आहे.
-तुषार पवार (म.स.गा. महाविद्यालय, मालेगाव)
अभिनयासाठी विशेष मेहनत
‘सिराजुद्दीन’च्या भूमिकेतील बारकावे लक्षात यावे, त्या पात्राचा अभ्यास करता यावा यासाठी फाळणीच्या काळातील काही चित्रफिती यु टय़ुबवर पाहिल्या. त्यावेळची परिस्थिती, नागरिकांची होणारी तगमग, त्यांना झालेला त्रास हे समजण्यासाठी वाचन केले. कळत नकळत सकिनाचा बाप कसा झालो कळलंच नाही. यामुळे अभिनय करतांना अगतिक बाप समोर आला. लोकांकिकेत पहिल्यांदा सहभाग घेत आहे. एवढे मोठे व्यासपीठ मिळाले याचा आनंद आहे.
– साहिल पाटील (के.टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिक)