मनमाड : धुळ्यात गुरुवारी रात्री गोळीबार करून लूट करण्यात आलेल्या चोरीच्या रकमेचे हिस्से करत असताना तिघा चोरटय़ांमध्ये वाद होऊन त्यांच्यापैकी दोघा भावांनी साथीदाराच्या पायावर गोळी झाडल्याने तो गंभीर जखमी झाला. ही थरार घटना शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातील भगतसिंग मैदान परिसरात घडल्याने शहरात खळबळ उडाली. मनमाड आणि धुळे पोलिसांच्या पथकाने गोळीबारात जखमीसह तिघांना ताब्यात घेतले.

धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या एका दूध डेअरीमध्ये गुरुवारी रात्री तिघा चोरटय़ांनी गोळीबार करत गल्ल्यातील रक्कम लंपास केली होती. तिघे धुळ्याहून दुचाकीने मनमाडकडे आले. चोरांची माहिती मिळताच धुळे पोलिसांनी नाशिक पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावरून जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्वत्र मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी सुरू केली. धुळे पोलिसांचे पथकही चोरांच्या मागावर होते. मनमाड शहरातील मध्यवर्ती भागात भगतसिंग मैदान परिसरात एका घराच्या गच्चीवर संशयित सागर मरसाळे, विनोद मरसाळे हे दोघे भाऊ आणि त्यांचा साथीदार गुरू भालेराव हे चोरीच्या मालाची वाटणी करत असताना त्यांच्यात वाद झाला. सागर आणि विनोद या भावांनी गुरूवर बंदुकीतून गोळी झाडली. गुरूच्या पायात गोळी घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. याच स्थितीत त्याने मनमाड पोलिसांना दूरध्वनीवरून आपल्यावर गोळीबार झाला असल्याची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. धुळे पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. धुळे पोलिसांनी जखमी भालेराव यास ताब्यात घेतले.

विनोद हा फरार झाला होता, पण शुक्रवारी सकाळी त्याच्या मागावर असलेल्या धुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जखमी गुरू भालेराव यास धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मनमाडचे पोलीस धुळे येथे तळ ठोकून आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी मनमाडला धाव घेतली. ज्या परिसरात गोळीबाराची घटना घडली तेथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. संशयिताची दुचाकी, बंदूक आणि लुटमारीतील काही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

चोरटय़ांची धुळे-मनमाड साखळी

सागर आणि विनोद मरसाळे हे दोघे भाऊ  असून गुरू भालेराव हा मरसाळे यांचा मावसभाऊ  आहे. मनमाड हे सागरचे सासर आहे. गुरू हादेखील मनमाडचा असल्याने अनेक गुन्हय़ांमध्ये सागर, विनोद आणि गुरू यांचा सहभाग आहे. मरसाळे बंधू धुळे शहरातील नगावबारीतील रहिवासी आहेत. मनमाड हे सागरचे सासर असल्याने तो रेल्वे लाइनवर गुन्हे करण्यात पटाईत आहे. गुन्हे केल्यानंतर सागर हा त्यांच्या सासरी किंवा धुळ्यात लपून बसतो. सागरविरुद्ध धुळ्यातही काही गुन्हे दाखल आहेत. सागर मरसाळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर धुळे जिल्हय़ासह जिल्हय़ाबाहेरील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. रेल्वे पोलीस ठाण्यातील २७ गंभीर गुन्हय़ात तो संशयित आहे. त्याच्या सोबतचे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती धुळे पोलिसांनी दिली आहे.

धुळे येथील डेअरीमध्ये जबरी चोरी करून पळालेल्या संशयिताची माहिती तेथील पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला दिली. या प्रकाराची पुढील कार्यवाही आणि तपास वेगाने सुरू आहे. वरील तिघा संशयितावर अन्य काही गुन्हे दाखल आहेत का याची माहिती घेतली जात आहे.

– संजय दराडे,

नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक