20 October 2019

News Flash

पाणीटंचाईमुळे हागणदारीमुक्त गाव संकल्पनेला तडा

नाशिक विभागाचा विचार केल्यास सध्या तब्बल साडेचार हजार गाव-वाडय़ांना टँकरने पाणी पुरविले जात आहे

(संग्रहित छायाचित्र)

अनिकेत साठे

पाणी वाचविण्यासाठी शौचालयांचा वापर नाही

पाण्याचे दुर्भिक्ष भासणाऱ्या बहुतांश गावांमध्ये शौचालयांसाठी पाणी कुठून आणायचे हा प्रश्न भेडसावत असून हागणदारीमुक्त म्हणून जाहीर झालेल्या महाराष्ट्रात दुष्काळामुळे ही संकल्पना लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये ग्रामस्थ उघडय़ावर प्रातर्विधी उरकत असून यात महिलांची अधिक कुचंबणा होत आहे. त्यांना भल्या पहाटे अथवा सायंकाळी अंधार पडल्यानंतर जावे लागत आहे. त्यामुळे यंदाच्या दुष्काळाने हागणदारीमुक्त गाव संकल्पनेला तडा गेला आहे.

नाशिक विभागाचा विचार केल्यास सध्या तब्बल साडेचार हजार गाव-वाडय़ांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. त्यात अहमदनगर पहिल्या तर लहान-मोठी २४ धरणे सामावणारे नाशिक द्वितीय स्थानी आहे. जलस्रोत आटल्याने शेकडो पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. गावांची तहान भागविण्यासाठी ४२५ विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या असून अनेक भागांत विहिरी आटल्या, हातपंप बंद झाले. टँकरद्वारे मिळणारे पाणी अपुरे पडत आहे. पाणीटंचाईच्या संकटाने ग्रामस्थांना शौचालयवापरापासून परावृत्त केल्याचे ग्रामसेवक, सरपंच सांगतात.

जेव्हा पाणी उपलब्ध होते, तेव्हाही काही जण उघडय़ावर शौचास जात होते. आता मात्र ज्यांना प्रातर्विधीसाठी बाहेर जायचे नाही, त्यांनाही जाणे भाग पडल्याचे गणेशगावचे माजी सरपंच शरद महाले यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्या वेणूबाई खोटरे यांनी कुटुंबातील सदस्यांना शौचालयाचा वापर टाळावा, असे सांगण्याची वेळ आल्याचे नमूद केले. बडर्य़ाची वाडीतील ग्रामस्थांना उन्हाळ्यात दोन ते तीन महिने बाहेर शौचास जाण्यावाचून गत्यंतर नसल्याचे खुद्द ग्रामसेवक सांगतात. ही स्थिती शेकडो गाव-वाडय़ांमध्ये आहे. सटाणा शहराला लागून असणाऱ्या भाक्षी गावची वेगळीच अडचण आहे. २०११ च्या जनगणनेतील साडेचार हजार लोकसंख्येच्या आधारे गावाला दोन टँकर मिळतात. प्रत्यक्षात लोकसंख्या तिप्पट असल्याने ते पाणी पुरत नाही. ग्रामपंचायत सदस्यांनी आर्थिक भार उचलून अतिरिक्त पाणी देण्याची तजवीज केल्याचे सरपंच पूनम सूर्यवंशी यांनी सांगितले.

गावोगावी उघडय़ावर शौचास जाणाऱ्यांना रोखण्यासाठी कार्यरत ‘गुड मॉर्निग’ पथकांनी सक्तीची विश्रांती घेतली आहे. या संदर्भात पाणी आणि स्वच्छता विभाग कोणतेही भाष्य करण्यास तयार नाही. अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे कारण देत मौन बाळगणे पसंत केले आहे.

विभागात २१ लाखांहून अधिक शौचालये

पायाभूत सर्वेक्षणानुसार नाशिक, नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे पाच जिल्हे मिळून २१ लाख २५ हजार १८५ कुटुंबे आहेत. त्यात १० लाख नऊ हजार १७ कुटुंबे सार्वजनिक किंवा समूह शौचालयांचा वापर करीत होती. हागणदारीमुक्त विभागाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वेक्षणानंतर तब्बल १२ लाख ५६ हजार ८८० शौचालयांची युद्धपातळीवर बांधणी करून विभागातील एकूण शौचालयांची संख्या २१ लाख २५ हजार १८५ वर नेण्यात आल्याचे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाने म्हटले आहे. त्यात अहमदनगर जिल्ह्य़ात सहा लाख २९ हजार ८०६, नाशिकमध्ये पाच लाख २७ हजार ८१४, धुळे दोन लाख ६२ हजार ८६९, जळगावमध्ये चार लाख ७२ हजार ८६१, नंदुरबारमध्ये दोन लाख ३१ हजार ८३५ शौचालयांचा समावेश आहे.

उपलब्ध पाण्याचे नियोजन

पिण्याच्या पाण्यासाठी विभागातील सुमारे ९०० हून अधिक गावे आणि ३४०० हून अधिक वाडय़ांना टँकर हाच आधार आहे. त्यांना सुमारे १२०० टँकरने पाणी दिले जात आहे. काही भागात टँकरही नाही. कुठे दीड-दोन किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागते. यातून जे पाणी उपलब्ध होते, ते मुख्यत्वे पिण्यासह स्वयंपाकासाठी वापरावे लागते. त्यातून शिल्लक पाण्यात भांडी धुणे अथवा तत्सम कामे केली जातात. पाणीबचतीसाठी शौचालयांचा वापर थांबविणे क्रमप्राप्त ठरल्याचे ग्रामस्थ सांगतात.

First Published on May 16, 2019 12:52 am

Web Title: toilets are not used to save water