आयुक्तांच्या दालनात कचरा फेकण्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांचा इशारा

नाशिक : ‘स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक’ घोषवाक्य असणाऱ्या महापालिकेच्या सिडको विभागात १५ पेक्षा अधिक दिवसांपासून घंटागाडय़ा बंद असल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी महापालिकेच्या सिडको कार्यालयात झालेल्या प्रभाग सभेत अधिकाऱ्यांना कचरा भेट देत गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले. कचरा प्रश्न दोन दिवसात न सुटल्यास पक्षभेद विसरून मंगळवारी होणाऱ्या महासभेत तसेच महापालिका आयुक्तालयांच्या दालनात कचरा फेक आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवकांकडून देण्यात आला आहे.

सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मर्जीतील घंटागाडी ठेकेदार यांच्यातील अंतर्गत वादामुळे संपूर्ण सिडको परिसर वेठीस धरला गेला असून घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले आहेत. सोमवापर्यंत घंटागाडी आणि घनकचरा व्यवस्थापन पूर्ववत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. परंतु, या इशाऱ्याला चार दिवस उलटूनही प्रशासनाकडून कुठलीच कारवाई झाली नाही. याचे पडसाद शुक्रवारी महापालिकेच्या सिडको कार्यालयातील प्रभाग सभेत उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना कचरा भेट म्हणून देत त्यांचा पुष्पहार घालत सत्कार केला.

या प्रकारामुळे सभेत गोंधळ उडाला. याविषयी शिवसेना नगरसेविका हर्षां बडगुजर यांनी १५ पेक्षा अधिक दिवसांपासून सिडको परिसरात घंटागाडी फिरकलेली नसल्याचे सांगितले. नागरिकांकडून सातत्याने विचारणा होत आहे. काहींनी तर घरासमोर येऊन कचरा टाकला. १५ वर्षांत असा प्रकार घडलेला नाही. याचा राग व्यक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना कचरा भेट देण्यात आला. महापालिका स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक या संकल्पनेला हरताळ फासत आहे. महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवापर्यंत घंटागाडी नियमित होईल असे आश्वासन दिले. ही सेवा पूर्ववत न झाल्यास मंगळवारच्या महासभेत याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा बडगुजर यांनी दिला. नगरसेविका पुष्पा आव्हाड यांनी सत्ताधारी भाजपला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप केला. मुख्य विषय बाजूला टाकण्यासाठी भाजपला पुढे केले जात आहे. मुळात महापालिका प्रशासन ठेकेदारांची देयके वेळेत देत नाहीत. पैसे न मिळाल्याने ठेकेदाराचे इंधन, कर्मचाऱ्यांचे पगार ही सर्व कामे रखडली आहेत. महापालिका प्रशासनाने याबाबत ठोस कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांसह सिडको प्रभाग सभापती दीपक दातीर आंदोलनात उपस्थित होते.

नगरसेविकेच्या पतीची घुसखोरी

सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक २७ च्या नगरसेविका किरण गामणे-दराडे यांचे पती बाळा दराडे यांचा महानगरपालिका किंवा सभा याच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसतांना बाळा दराडे थेट प्रभाग सभेत आले. त्यांनी कचऱ्याच्या प्रश्नाविषयी भावना व्यक्त करण्यासाठी महापालिका अधिकारी बुकाणे यांना सडक्या फुलांचा हार घातला. तसेच भाजप विरोधात घोषणाबाजी केली. या प्रकरणाने सभेत एकच गोंधळ उडाला. बाळा दराडे यांच्या कृतीबद्दल अन्य नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

महापालिका प्रशासनाचे अपयश

तत्कालीन महापौर प्रकाश मते यांच्या कार्यकाळात घंटागाडी कचरा योजना सुरू झाली. ही योजना सुरू ठेवण्याची सध्या महापालिका प्रशासनाची मानसिकता नाही. त्यावेळी असणारा तीन कोटीचा खर्च सद्यस्थितीत ३३ कोटीच्या घरात पोहचला तरी सेवा विस्कळीत आहे. याला जबाबदार कोण? घंटागाडी वेळेत येत नाही. लोक कचरा संपर्क कार्यालयात आणून टाकत आहेत. हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अपयश आहे. आयुक्तांनी यातून काही धडा घ्यावा अन्यथा महासभेसह आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकण्यात येईल – सुधाकर बडगुजर  (शिवसेना नेते-नगरसेवक)